Join us

Time Deposit Account: बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या या स्किममध्ये मिळते बंपर व्याज, असा घेता येईल लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 3:29 PM

Time Deposit Account: गेल्या काही वर्षांमध्ये पोस्ट ऑफीसच्या तुलनेत बँकांमध्ये फिक्स डिपॉझिटची संख्या वाढली आहे. मात्र अजूनही बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये अधिक व्याज मिळते. तसेच ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये पोस्ट ऑफीसच्या तुलनेत बँकांमध्ये फिक्स डिपॉझिटची संख्या वाढली आहे. मात्र अजूनही बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये अधिक व्याज मिळते. तसेच ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.

अशा परिस्थितीत तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसह उत्तम रिटर्न मिळवू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स डिपॉझिट करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक अशा योजना आहेत. ज्यामध्ये बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळते. तर केवळ ५०० रुपयांमध्ये तुम्ही पोस्टामध्ये सेव्हिंग अकाऊंट उघडू शकता.

सध्या देशामध्ये बहुतांश सरकारी बँका फिक्स डिपॉझिटवर ५.४ टक्के व्याज देत आहेत. तर सिनियर सिटिझनला फिक्स डिपॉझिटवर ६.२ टक्के व्याज दिले जात आहे. मात्र पोस्ट ऑफिसमध्ये याच्या तुलनेत अधिक व्याज मिळत आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये सध्या टाइम डिपॉझिट अकाऊंट एक उत्तम स्किम आहे. त्यावर ६.७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. तर सिनियर सिटिझन सेव्हिंग स्किममध्ये ७.४ टक्के व्याज दिले जात आहे.

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये केवळ एक हजार रुपयांमध्ये टाइम डिपॉझिट अकाऊंट उघडू शकता. हे खाते उघडणे खूप सोपे आहे. यामध्ये तुम्ही १ ते ५ वर्षांपर्यंत पैसे डिपॉझिट करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यामध्ये गुंतवणुकीला कुठलीही कमाल मर्यादा नाही आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट अकाऊंटअंतर्गत १ ते ३ वर्षांपर्यंतसाठी एफडीवर ५.५ टक्के व्याज आणि पाच वर्षांसाठी गुंतवणुकीवर ६.७ टक्के व्याज मिळते. हे व्याज दर तिमाहीच्या आधारावर कॅल्क्युलेट केलं जातं. मात्र त्याची रक्कम वार्षिक पद्धतीने जमा केली जाते. बँकांच्या बचत खात्यांच्या तुलनेत या स्किममध्ये व्याज डबल मिळते.

या योजनेमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नावाने खाते उघडू शकतात. जर मुलांचे वय १० वर्षांपेक्षा अधिक असेल, तर ते स्वत: अकाऊंट ऑपरेट करू शकतात. त्याशिवाय तुम्ही या स्कीमअंतर्गत वाटेल तेवढी खाती उघडू शकतात. या स्किममध्ये जॉईंट अकाऊंट उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या जॉईंट अकाऊंटला सिंगल अकाऊंटमध्ये कन्व्हर्ट करू शकता.

त्याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटवर ६.८ टक्के  रिटर्न मिळतो. त्यामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्सच्या  सेक्शन ८०सी अंतर्गत टॅक्समध्ये सूटही मिळते. मात्र या गुंतवणुकीवर पाच वर्षांचा लॉकइन पिरियड राहतो. म्हणजेच ५ वर्षांच्या आधी तुम्ही हे पैसे काढू शकत नाही.

तसेच किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्यावर १२४ महिन्यांमध्ये रक्कम डबल होईल. दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत यावरील इंट्रेस्ट रेट ६.९ टक्के निश्चित केला गेला आहे. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळानुसार या स्किमचा मॅच्युरिटी पिरिएड १२४ महिने म्हणजेच १० वर्षे चार महिने आहे.  

टॅग्स :गुंतवणूकबँकपोस्टल ग्राऊंड