मुंबई : परदेशी विनिमय चलन कायद्याचे (फेमा) कथित उल्लंघन झाल्याप्रकरणी सोमवारी उद्योगपती अनिल अंबानी यांची ईडीने (सक्तवसुली संचालनालय) चौकशी केल्यानंतर आता मंगळवारी त्यांची पत्नी टिना अंबानी यांचीदेखील ईडीने चौकशी केली. टिना यांना ईडीने सोमवारीच अनिल अंबानी यांच्यासोबत चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी अधिक वेळ मागून घेतला होता. त्यानुसार त्या मंगळवारी ईडीच्या मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयामध्ये उपस्थित राहिल्या. तर याच प्रकरणात अनिल अंबानी यांना पुन्हा एकदा ईडी चौकशीसाठी बोलावणार असल्याचे समजते.
पेन्डोर पेपर तपासादरम्यान भारतीय उद्योगपतींची परदेशात असलेली गुंतवणूक, याची माहिती समोर आली होती. अंबानी यांचेदेखील त्यात नाव आले होते. ईडी अंबानी दाम्पत्याची चौकशी नेमक्या कोणत्या प्रकरणात करत आहे, याची अधिकृत माहिती ईडीने दिलेली नाही. मात्र, अनिल अंबानी यांनी परदेशातील ८०० कोटी रुपयांची मालमत्ता (सध्याच्या रुपया - डॉलर चलन दरानुसार ) आयकर विवरणामध्ये घोषित केली नव्हती. त्या प्रकरणी आयकर विभागाने त्यांना नोटीस जारी करत त्याची तपासणी सुरू केली होती. त्यादरम्यान या प्रकरणी फेमा कायद्याचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्याच अनुषंगाने ईडी सध्या अंबानी दाम्पत्याची चौकशी करत असल्याचे समजते.