Join us

Tirupati Balaji Temple : ११ हजार किलो सोने, कोट्यवधींची रोकड! तिरुपती बालाजी मंदिराकडून सरकारला किती टॅक्स मिळतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 4:31 PM

Tirupati Balaji Temple : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराजवळ अमाप संपत्ती आहे. हजारो किलो सोने आणि कोट्यवधींची रोकड बँकेत जमा आहे.

Tirupati Balaji Temple : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर सध्या लाडू प्रसादामुळे चर्चेत आलं आहे. राज्यातील चंद्राबाबू नायडू सरकारने माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात मंदिराच्या प्रसादात भेसळ केल्याचा आरोप केला आहे. मंदिराचा प्रसाद बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल वापरले जात असल्याचं एका प्रयोगशाळेच्या अहवालात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यात काय खरं, काय खोटं याचा तपास होईलच. मात्र, एवढे श्रीमंत मंदिर सरकारला किती टॅक्स देते? याची तुम्हाला माहिती आहे का?

आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. गेल्या वर्षी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होऊनही भाविकांनी या मंदिरात मोठ्या प्रमाणात सुवर्णदान केले. या मंदिराला २०२३ मध्ये १ हजार ३१ किलो सोन्याचा प्रसाद मिळाला, ज्याची किंमत अंदाजे ७७३ कोटी रुपये आहे. सद्य स्थितीत तिरुपती ट्रस्टकडे एकूण ११ हजार ४२९ किलो सोने आहे, ज्याची किंमत सुमारे ८ हाजर ४९६ कोटी रुपये आहे.

तिरुपती बालाजी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत विविध बँकांमध्ये सोने जमा केले आहे. भाविक नैवेद्य म्हणून रोख आणि सोने दान करणे पसंत करतात. मंदिराशी संबंधित विविध ट्रस्टने बँकांमध्ये एफडीच्या रूपात १३ हजार २८७ कोटी रुपये जमा केले आहेत, ज्यावर वार्षिक १ हजार ६०० कोटी रुपयांचे व्याज मिळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिरुपती ट्रस्टकडे एप्रिल २०२४ पर्यंत १८ हजार ८१७ कोटी रुपयांची विक्रमी रोकड शिल्लक आहे.

५,००० कोटींपेक्षा जास्त बजेटआकडेवारीनुसार, गेल्या १२ वर्षांत ट्रस्टने केलेल्या एफडीची रक्कम केवळ तीन वेळा ५०० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. ट्रस्टने २०२४-२५ या वर्षासाठी ५,१४१.७४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. या मंदिर प्रशासनाने पहिल्यांदाच ५,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ट्रस्टला प्रसादाच्या विक्रीतून ६०० कोटी रुपये, दर्शन तिकीटातून ३३८ कोटी रुपये आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या कर्जातून २४६.३९ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे.

ट्रस्टला इतर भांडवली पावत्यांमधून १२९ कोटी रुपये, अर्जित सेवा तिकिटांमधून १५० कोटी रुपये आणि कल्याण पावत्यांमधून १५१.५ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. तसेच, देणग्यातून १ हजार ६११ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

सरकारला किती फायदा?अर्थसंकल्पानुसार, ट्रस्ट एचआर पेमेंटच्या स्वरुपात १ हजार ७३३ कोटी रुपये खर्च करेल. त्याचप्रमाणे ट्रस्ट साहित्य खरेदीसाठी ७५१ कोटी रुपये आणि इतर गुंतवणुकीवर ७५० कोटी रुपये खर्च करणार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) दरवर्षी आंध्र प्रदेश राज्य सरकारला 50 कोटी रुपयांचे योगदान देते.

टॅग्स :करइन्कम टॅक्सआंध्र प्रदेश