Join us

वर्षभरात १०४% नी वाढला हा शेअर, आता मिळाली संरक्षण मंत्रालयाकडून ₹१७० कोटींची ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 3:31 PM

या ऑर्डरचे मूल्य अंदाजे १७० कोटी रुपये आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट स्वाक्षरीनंतर १२ महिन्यांनी सुरू होणार आहे.

Titagarh Rail Shares: टीटागढ रेलला (Titagarh Rail) संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीनं शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं. संरक्षण मंत्रालयाकडून २५० स्पेशलाईज्ड वॅगनचं उत्पादन आणि पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य अंदाजे १७० कोटी रुपये आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट स्वाक्षरीनंतर १२ महिन्यांनी सुरू होणार आहे आणि ३६ महिन्यांत पूर्ण होणार आहे. या कंपनीनं गेल्या महिन्यात रेल्वे कम्पोनन्ट्स आणि सबसिस्टम व्यवसायात उतरण्यासाठी दिल्लीस्थित अंबर ग्रुपसोबत भागीदारीची घोषणा केली होती.  

भारत आणि युरोप या दोन्ही ठिकाणी त्यांची उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशानं दोन्ही कंपन्यांनी स्पेशल पर्पज व्हेईकलची (SPV) स्थापना केली आहे. टिटागढ रेल सिस्टम्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी यांनी CNBC-TV18 ला यासंदर्भातील माहिती दिली. हा करार त्यांच्यासाठी युरोपमध्ये नवीन संधी निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये (EU) सबसिस्टम आणि ट्रेन इंटीरियरच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

 

शेअरची स्थिती काय? 

टिटागढ रेल सिस्टीमचे शेअर्स शुक्रवारी ०.५३% वाढून ९५३.७० रुपयांवर बंद झाले. गेल्या महिन्यात स्टॉक ११.६ टक्क्यांनी घसरला आहे. तथापि, गेल्या सहा महिन्यांत त्यात ४४.१३ टक्के आणि गेल्या एका वर्षात त्यात १०४.०४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १,२४८.९० रुपये आहे आणि कंपनीचे शेअर्स सध्या या पातळीपेक्षा २३.३१ टक्क्यांनी घसरुन ट्रेड करत आहेत. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २०३.२० रुपये आहे. 

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजाररेल्वे