आपणही व्यवसाय करावा आणि त्यात यशस्वी व्हावं अशी अनेकांची इच्छा असते. परंतु कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटी यासाठी आवश्यक असते. शार्क टँक इंडियाचे जज आणि कार देखोचे (CarDekho.com) संस्थापक अमित जैन यांनी उद्योजक होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला आहे. "उद्योजकता म्हणजे केवळ तुमची उत्पादने बाजारात उतरवणं नव्हे. ही तुमच्या विचारांची मॅरेथॉन आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या कल्पनेवर सतत काम करावं लागतं. इव्होल्यूशन आणि मेनिफेस्टेशनद्वारे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता," असं अमित जैन म्हणाले. यासाठी त्यांनी इमारतीच्या उभारणीचंही उदाहरण दिलं. "कोणतीही इमारत दोनदा उभारली जाते. आधी ती तुमच्या डोक्यात उभारली जाते, मग ती सत्यात उभारली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
व्यवसायाची कल्पना आपली कल्पना तयार करण्यापासून ते सत्यात उतरवण्यापर्यंत, आपल्याला हे समजून आलंय की मोठी स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे, असं जैन म्हणाले. उद्योजकाची दूरदृष्टी ही स्टार्टअपच्या स्ट्रक्चरमधील पहिली वीट आहे. दूरदृष्टी हे खरं तर असे बीज आहे ज्यातून तुमच्या कर्तृत्वाचा वृक्ष वाढतो. विचारांमुळे त्याची मूळं पसरतात आणि तुम्ही क्रिएटिव्हीटी तसंच निर्धाराचं खत-पाणी देऊन तुम्ही ते वाढवता. तुमचं मन हे एक अतिशय शक्तिशाली साधन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्वप्नांचे जग घडवू शकता, असं त्यांनी नमूद केलं.
उद्योजकतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनात एक कल्पना आणा आणि ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मर्यादेपलीकडे विचार करा आणि अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही विचार करू शकता की जगात काहीही अशक्य नाही, तुम्ही काहीही करू शकता. तुमची स्वप्ने साकार करा. ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेनिफेस्टेशनची ताकद अतिशय आवश्यक आहे," असंही जैन यांनी स्पष्ट केलं.