भारताचे अब्जाधीश उद्योगपती राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) हे आगामी काळात मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) योजनांना मोठा धक्का देऊ शकतात. मुकेश अंबानींप्रमाणेच राधाकिशन दमानी यांचीही रिटेल क्षेत्रावर नजर आहे. त्यामुळेच आगामी काळात डीमार्टचे स्टोअर पाच पटीने वाढवण्याच्या योजनेवर ते काम करत आहेत. मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल लिमिटेडवर कुठेतरी त्याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१३०० नवीन स्टोअर्स सुरू करण्याची योजना
एव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड स्टोअर्समध्ये सध्या २८९ स्टोअर्स आहेत. या स्टोअर्सची संख्या १५०० पर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे. म्हणजेच सध्याच्या संख्येपेक्षा पाचपट अधिक स्टोअर्स उघडण्याच्या योजनेवर कंपनी काम करत आहे. परंतु कंपनीच्या सीईओंनी त्यांच्या मुलाखतीत हे लक्ष्य गाठण्यासाठी कोणत्याही कालमर्यादेचा उल्लेख केलेला नाही. लाईव्ह मिंटनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
दिग्गज प्लेअर्स एकमेकांची चिंता न करता त्यांचे काम करू शकतील. पुढील २० वर्षे काळजी करण्याची गरज नाही. या क्षेत्रात चांगली वाढ दिसत आहे, असंही कंपनीच्या सीईओंनी सांगितलं. दरम्यान, कंपनीनं या वर्षी मार्चपासून ५० नवीन स्टोअर उघडले आहेत. मात्र, वाढत्या महागाईमुळे कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम झाला आहे. ६८ वर्षीय राधाकिशन दमानी यांची कंपनी Demart ने २०१७ मध्ये शेअर बाजारात पदार्पण केले. तेव्हापासून स्टॉक १३७० टक्क्यांनी वधारला आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती २२.१ अब्ज डॉलर इतकी आहे.