Join us

तंबाखू, कोल्ड ड्रिंक आणखी महागणार? जीएसटी २८ वरुन ३५ टक्केपर्यंत वाढविण्याची मंत्रिगटाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 8:16 AM

मंत्रिगटाने एकूण १४८ वस्तूंच्या दरांमध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे.

नवी दिल्ली : जीएसटी कररचना सुलभ करण्यासाठी गठीत केलेल्या मंत्रिगटाने कोल्ड ड्रिंक, सिगारेट आणि सर्व तंबाखू उत्पादनांवरील कर सध्याच्या २८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे ही उत्पादने आणखी महाग होऊ शकतात.

मंत्रिगटाने एकूण १४८ वस्तूंच्या दरांमध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. यात १५०० रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर ५% जीएसटी, तर १,५०० ते १०,००० रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर १८ टक्के आणि १० हजार रुपयांपेक्षा अधिक रेडिमेड कपड्यांवर २८ टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस केली. मंत्रिगटाने लेदर बॅग, सौंदर्यप्रसाधनांसह अनेक लक्झरी वस्तूंवर जीएसटी वाढवण्याची शिफारस केली आहे.

निर्णय कधी होणार?

जीएसटी परिषदेची ५५ वी बैठक २१ डिसेंबर २०२४ रोजी राजस्थानच्या जैसलमेर येथे होणार आहे असून, या बैठकीत जीएसटी कमी-जास्त करण्यावर निर्णय होईल. या बैठकीत आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील जीएसटी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिगटाच्या या शिफारशींवर जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेईल. १३ सदस्यीय मंत्री गटाचे निमंत्रक बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आहेत.

काय स्वस्त, काय महाग?

■ सायकल : १०,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सायकलवरील जीएसटी १२% वरून ५% कमीची शिफारस केली आहे. 

पाण्याची बाटली : २० लिटर पाण्याच्या बाटलीवरील जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी करण्याची शिफारस केली आहे.

एक्सरसाइज नोटबुक : मुलांसाठी एक्सरसाइज नोटबुकवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याची शिफारस मंत्रिगटाने केली आहे.

मनगटी घड्याळ : २५,००० रुपयांपेपेक्षा अधिक किमतीच्या मनगटावरील घड्याळावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून २८% पर्यंत वाढवण्याची शिफारस केली आगे. 

■ शूज : १५,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शूजवर जीएसटी १८% वरून २८% पर्यंत वाढवण्याची सूचना.

टॅग्स :जीएसटी