मुंबई : गुंतवणुकीचे अन्य पर्याय सध्या कमकुवत ठरत असल्याने सोने बाजारात उलाढाल वाढली आहे. बुधवारच्या अक्षय तृतीयेला राज्यभरातील सोने बाजारात ४० हजार तोळ्याहून अधिक खरेदी-विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.मुंबईमुळे महाराष्टÑात सोन्याची मोठी उलाढाल होते. पण पुणे, जळगाव, अकोला व नागपूर याही सोन्याच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. परराज्यातील सोने व्यापारी तेथून सोने खरेदी करतात. आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे मनोज कुमार झा यांनी सांगितले की, सोने बाजारात आधी मंदीसदृश्य स्थिती होती. आत दर ठराविक उंचीवर गेले आहेत. ते सध्या ३१ ते ३२ हजार रुपये प्रति तोळ्यावर आहेत. हे दर आणि सध्याचा काळ दीर्घकालिन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. त्यातच अक्षय तृतीया आल्याने विक्रीत २० टक्के वाढ झाली आहे.दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई महानगर क्षेत्रात घरांच्या खरेदीला उधाण आले आहे. विशेषत: परवडणाऱ्या घरांना मागणी असून, घरांचे दर स्थिर असल्याने, ग्राहकांमध्ये खरेदीबाबत उत्साह दिसत असल्याचे बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचे अशोक गुप्ता यांनी सांगितले.सोने बाजारात झळाळी असताना तीन वर्षांपूर्वीपर्यंत राज्यात दिवसाला सुमारे ६५ हजार तोळे सोन्याची उलाढाल होत असे. पण शेअर बाजार, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीमुळे उलाढाल २० ते २२ हजार तोळ्यापर्यंत घसरली. ते दोन्ही पर्याय फार परतावा देत नसल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढली.
आज अक्षयतृतीया; ४० हजार तोळे सोने खरेदीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:30 AM