Join us  

आजच्या आढाव्यात व्याज दर ‘जैसे थे’?

By admin | Published: August 09, 2016 3:37 AM

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे मंगळवारी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा पतधोरण आढावा सादर करणार आहेत.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे मंगळवारी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा पतधोरण आढावा सादर करणार आहेत. यात धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता आहे. पुढील आढावा ४ आॅक्टोबर रोजी सादर होणार असून, त्यापूर्वीच ही समिती सूत्रे होती घेईल. पतधोरण समितीवर आपले तीन सदस्य नेमतानाच सरकार रघुराम यांचा वारसदारही या महिन्यात नेमणार आहे. २0२१ पर्यंत महागाईचा दर ४ टक्क्यांवर नियंत्रित करण्याचे धोरण सरकारने गेल्याच आठवड्यात जाहीर केले. नवी पतधोरण समिती यानुसार व्याजाचे दर ठरविल, असेही सरकारने म्हटले होते. ४ टक्क्यांच्या प्रस्तावित महागाई दरात २ टक्के अधिक-उणे गृहीत धरण्यात आले आहे. म्हणजेच हा दर किमान २ टक्के आणि कमाल ६ टक्के होण्यास वाव आहे. एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले की, भाजीपाल्याच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांत कोणताही बदल आम्हाला अपेक्षित नाही. भाजीपाल्याच्या किमती कमी होण्यास खरिप पिके बाजारात येण्यापर्यंत वाट पाहावी लागेल. जूनमध्ये ग्राहक वस्तू निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ५.७७ टक्क्यांवर होता. हा २२ महिन्यांतील उच्चांक होता. वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी मात्र रिझर्व्ह बँक व्याज दरात ५0 आधार अंकांची कपात करील, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ब्रिटनसह संपूर्ण जगात व्याज दर खाली आणले जात आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडूनही कपातीची मजबूत अपेक्षा आहे. देशातील अर्थव्यवस्थेचे सर्व मापदंडही दर कपातीला पुरक स्थितीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)