Join us

आर्थिक प्रगतीसाठी सहिष्णुता अति आवश्यक- रघुराम राजन

By admin | Published: November 02, 2015 12:02 AM

या संस्थेच्या पदवीदान समारंभात भाषण करण्यासाठी मला पाचारण केल्याबद्दल मी आभारी आहे. मी ३० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिकल विभागात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे

या संस्थेच्या पदवीदान समारंभात भाषण करण्यासाठी मला पाचारण केल्याबद्दल मी आभारी आहे. मी ३० वर्षांपूर्वी इलेक्ट्रिकल विभागात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ही संस्था मला भविष्यासाठी एवढ्या चांगल्या रीतीने तयार करेल, असे त्यावेळी वाटले नव्हते. त्यावेळी मी भविष्याबद्दल चिंतातुरच होतो. त्यावेळचे आमचे प्रोफेसर व्यावसायिकदृष्ट्या समर्पित होते. मी कोणाचेही नाव घेणार नाही. आमच्यासमोर असलेली आव्हाने आणि आमची पात्रता पाहून ते सर्वचजण आम्हाला बरेच काही सांगत असत. त्यावेळी आयआयटी दिल्लीत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्लासमध्ये कॉम्प्युटर सायन्स हा एक भाग होता. माझ्या आठवणीप्रमाणे या संस्थेतून काही अतिशय स्मार्ट लोक बाहेर पडले आहेत. त्यांच्या सोबत सहकारी म्हणून काम करताना आणि ग्रेडसाठी त्यांच्यासाठी स्पर्धा करताना, स्पर्धेच्या वातावरणात यश मिळविण्यासाठी काय करावे लागते हे मी बरेच काही शिकलो. तेव्हा मिळालेले धडे अजूनही मी लक्षात ठेवले आहेत.त्यावेळी विद्यार्थ्यांचे राजकारण चर्चेत होते. तो एक वैचारिक काळ होता; पण आज मात्र विद्यार्थ्यांचे राजकारण हिंसाचार आणि भ्रष्टाचाराशिवाय होत नाही. देशात अन्यत्र हीच स्थिती आहे. आता तुम्हाला छोट्यातील छोट्या हुशार मतदारालाही त्याने तुम्हाला का मत द्यावे हे पटवून सांगावे लागते. त्याचे मत मिळविताना आम्ही त्याचे मन वळविण्यासाठी शिकलो. पदवीदान समारंभात झालेली बहुतेक भाषणे विसरली जातात, हे मला येथे भाषण करताना माहीत आहे. त्यामुळे भाषण करणाऱ्याला त्याचे मानसिक दु:ख होते. आज मी जे काही सांगणार आहे, त्याचे स्मरण राहत नसल्यास कठीण शब्द वापरून भाषण करण्यास मला आवडणार नाही. असे असले तरीही एक प्रमुख पाहुणा म्हणून मी माझ्या धर्माचे पालन करणार आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी चर्चा करण्याची का गरज आहे, याबाबत मी बोलणार आहे. चर्चा ही भारताची परंपरा आहे. आजच्या काळात ती फार महत्त्वाची आहे. आर्थिक प्रगती केवळ उत्पादन, कामगार आणि भांडवलातून होत नाही असे दाखवून दिल्याने रॉबर्ट स्लो यांना अर्थशास्त्रातील नोबेल मिळाले. उलट हे सर्व घटक एकत्रित करून त्यांचा योग्य वापर केला तरच आर्थिक प्रगती होते. आपण भारतात राहतो. उत्पादनाचा विचार करता आपण फार मागे आहोत. त्यामुळे औद्योगिक देशांनी वापरलेल्या तंत्राचा उपयोग करून आपण प्रगती साधू शकतो. तुमच्यातील बऱ्याच जणांनी अर्थशास्त्र हा विषय घेतलेला असल्याने तुम्हाला ही बाब समजेल. ई-कॉमर्सचेच उदाहरण घ्या. या क्षेत्रात चमकदार घडामोडी झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक मार्केटसह नवीन मार्केट ठिकाणांची निर्मिती ते पैसे देण्याच्या पद्धती यात नाट्यमय प्रगती झाली आहे. आता नवीन संकल्पना आणि नवीन पद्धतीमुळे आर्थिक वृद्धीत भर पडत आहे.या स्थितीत एखादी शैक्षणिक संस्था किंवा देश यांना विचारांचा कारखाना खुला ठेवण्याची का गरज आहे? बाजारात नवीन कल्पनांसाठी स्पर्धा असली पाहिजे. एखादी कल्पना किंवा विचार फेटाळून लावण्यासाठी दुसरी कल्पना किंवा विचार मांडूनच ती नाकारण्याची आमची परंपरा आहे. असे न करता आज सत्तेचा प्रभाव वापरून दुसऱ्यावर विचार लादले जात आहेत. उलट सर्व विचारांचा कीस पाडला पाहिजे. एखादा विचार हजारो वर्षांपासून अस्तित्वात असतो किंवा तो परदेशातूनही आलेला असतो. हा विचार प्रगल्भ विद्यार्थ्यांकडून किंवा शिक्षण न घेतलेल्या विद्यार्थ्यांकडूनही आलेला असू शकतो किंवा जागतिक दर्जाच्या प्रोफेसरने मांडलेला असू शकतो. आपण सर्व जण रिचर्ड फेनमॅन यांचे भौतिकशास्त्रातील मार्गदर्शन वाचले असेलच. नोबेल विजेते हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक विसाव्या शतकातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात ते असलेल्या संस्थेतील वातावरण कसे होते याचा उल्लेख केला आहे. प्रिन्सेंटॉन इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज ही त्यावेळी जगातील एक उत्कृष्ट संस्था होती. तेथे अत्यंत कडक शिस्त होती; पण तेथे प्रश्न विचारणारे विद्यार्थीच नव्हते, असे त्यांना आढळले. विद्यार्थ्यांनी जर प्रश्नच विचारले नाहीत, तर नवीन संकल्पना कशा उदयास येतील, असा प्रश्न त्यांना पडला. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनीही त्यांच्या सापेक्षवादाचा सिद्धांत अशाच पद्धतीने मांडला. प्रकाशाच्या वेगाने धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास करताना काय अनुभव येतो असा काहीसा विक्षिप्त प्रश्न उपस्थित झाल्याने आईन्स्टाईन यांना सापेक्षतावादाचा सिद्धांत सुचला. त्यामुळे कोणताही प्रश्न वगळता येत नाही. प्रश्न उपस्थित न करता कोणालाही त्याच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी परवानगी दिली जाऊ नये. असे होत नसेल तर विचारांची स्पर्धाच कुंठित होईल.असे होत असेल तर दुसरा अत्यावश्यक प्रश्न उभा राहतो. केवळ विशिष्ट विचारांचे, परंपरांचे संरक्षण करावयाचे असेल तर प्रश्न विचारण्याचा आणि आव्हान देण्याचा अधिकारही असला पाहिजे; पण या दोन्ही अधिकारांवरून परस्परांना इजा केली जाता कामा नये. सामाजिक हित सांभाळताना समाजात उद्भवणाऱ्या बंडखोर विचारांचाही सन्मान केला पाहिजे. आर्थिक विकासात अशा बाबींचाही समावेश होतो असे सोवोल यांनी पटवून दिले आहे. सुदैवाने भारतात चर्चा करण्याच्या आणि वेगळी मते मांडण्याच्या अधिकारांचे रक्षण होत आले आहे. काही विचार स्थायी स्वरूपाचे झाले आहेत. चोल राजाने तंजावर येथे भगवान शिवाचे विशाल मंदिर बांधताना भगवान विष्णू आणि ध्यानमग्न गौतम बुद्धाची मूर्तीही स्थापन केली. त्यांच्या या कृतीमुळे पर्यायी विचारांना वाव असल्याचे दिसून आले आहे. शहेनशहा जलालुद्दीन मुहंमद अकबर याने त्याच्या दरबारात सर्वच प्रकारच्या विचारांना वाव दिला होता; पण न्यायालयात मात्र त्याने हिंदू आणि बुद्ध राजांच्या विचारांचीच अंमलबजावणी केली. कारण त्यांनी सर्वच प्रकारच्या पैलूंना वाव दिला होता.न पटणाऱ्या विचारांवर बंदी घातल्यास चर्चाच संपुष्टात येईल. कोणताही विशिष्ट समूह किंवा व्यक्तीला त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल किंवा विचाराबद्दल शारीरिक इजा किंवा अपमानकारक शब्द वापरण्याची परवानगी देता कामा नये. लैंगिक छळाचेच उदाहरण घ्या. ते शारीरिक असो की शाब्दिक, अशा छळाला समाजात स्थान नाही. एखादा गट, व्यक्ती प्रस्थापितांना मान्य नसलेले विचार मांडत असेल तर त्याचा अपमान करू नये. त्यांच्या विचारांचा विचारांनीच सामना करायला पाहिजे. अत्याधिक अचूक राजकीय उपायांनी प्रगती खुंटते. असहिष्णुता आणि अनादर यांचाही प्रगतीवर परिणाम होतो.तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडूनच भारताच्या नवीन विचारांची स्पर्धा लागेल. आम्ही भारताला प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आहे त्यापेक्षा जास्त प्रगल्भ सहिष्णू भारत तयार करू शकाल. तुमच्या अमर्याद महत्त्वाकांक्षांना माझ्या सदिच्छा आहेत. विचार व्यक्त करणाऱ्यांना आणि आव्हान देणाऱ्यांना हेच शक्य आहे. सहिष्णुता आणि परस्पर आदर यासाठी लढा द्या. तसे झाल्यास या महान संस्थेतील शिक्षकांची व पालकांची शिकवण कामी आली असे म्हणता येईल. तरच देशाची महान सेवा केल्यासारखे होईल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद!