Join us  

आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 6:22 AM

Toll collection: रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरात असलेली ‘फास्टॅग’ची व्यवस्था लवकरच रद्दबातल करून उपग्रहावर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल वसुली व्यवस्था आणण्यात येणार आहे.

 नवी दिल्ली : रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरात असलेली ‘फास्टॅग’ची व्यवस्था लवकरच रद्दबातल करून उपग्रहावर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल वसुली व्यवस्था आणण्यात येणार आहे. आगामी २ वर्षांत टप्प्याटप्प्याने नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जीएनएसएस आधारित टोल संकलन यंत्रणा तैनात करण्यासाठी जागतिक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, रस्ते टोल वसुलीसाठी ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’ (जीएनएसएस) ही व्यवस्था आणली जाणार आहे. सर्वप्रथम व्यावसायिक वाहनांसाठी जीएनएसएस लागू केले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कार, जीप आणि व्हॅन या वाहनांसाठी ती लागू केली जाईल. सुमारे २ वर्षांच्या कालावधीत देशातील सर्व  टोल वसुली यावर आणली जाईल. ही व्यवस्था लागू झाल्यानंतर सध्याचे टोल नाके आणि फास्टॅग या दोन्हींची गरज राहणार नाही.

काय फायदा होणार?नव्या तंत्रज्ञानामुळे टोल नाक्यांवर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीपासून सर्वांची सुटका होईल. वाहन महामार्गावर जेवढे अंतर चालेल तेवढा टोल वसूल केला जाईल. या तंत्रज्ञानात वाहनावर उपग्रहाची नजर असणार आहे.

प्रत्येक नाक्यावर २ मार्गिकाप्रत्येक टोल प्लाझावर २ अथवा त्यापेक्षा अधिक जीएनएसएस मार्गिका असतील. या रचनेत वाहनांची ओळख पटविण्यासाठी तेथे अग्रिम रीडर बसविले जाणार आहेत. ज्या वाहनांकडे जीएनएसएस नसेल त्यांच्याकडून जास्तीची वसुली केली जाईल.

टॅग्स :टोलनाकापैसा