नवी दिल्ली : देशात सध्या कांद्याऐवजी टोमॅटो सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. टोमॅटोच्या किमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. दक्षिण भारतातील काही भागांमध्ये टोमॅटोची किंमत 140 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. सरकारी माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठ्यात अडथळे आल्यानेही किमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, सप्टेंबरपासून देशातील बहुतांश किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव उच्चांकावर पोहोचले होते. परंतु दक्षिण भारतीय राज्यांमध्ये संततधार पावसामुळे किमती आणखी वाढल्या आहेत.
ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, टोमॅटोचा भाव सोमवारी उत्तर भारतात 30-83 रुपये प्रति किलो होता, पश्चिम भागात 30-85 रुपये आणि पूर्व भारतात 39-80 रुपये प्रति किलो होता. अखिल भारतीय आधारावर, गेल्या काही आठवड्यांपासून टोमॅटोची सरासरी किंमत 60 रुपये किलो आहे. दक्षिण भारतात टोमॅटोचे भाव सर्वाधिक झाले आहेत. सोमवारी अंदमान निकोबारच्या मायाबंदरमध्ये 140 रुपये, पोर्ट ब्लेअरमध्ये 127 रुपये होते. तिरुअनंतपुरम, केरळमध्ये 125 रुपये, पलक्कड आणि वायनाड 105 रुपये, त्रिशूर 94, कोझिकोड 91 आणि कोट्टायम 83 रुपये प्रति किलो होते.
किचनची शान समजला जाणारा टोमॅटो कर्नाटकातील मंगळुरु आणि तुमाकुरू येथे 100 रुपये किलो, धारवाडमध्ये 75 रुपये किलो, म्हैसूरमध्ये 74 रुपये किलो, शिवमोग्गामध्ये 67 रुपये किलो, दावणगेरेमध्ये 64 रुपये किलो आणि बंगळुरूमध्ये 57 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर तामिळनाडूतील रामनाथपुरममध्ये 102 रुपये किलो, तिरुनेलवेलीमध्ये 92 रुपये किलो, कुड्डालोरमध्ये 87 रुपये किलो, चेन्नईमध्ये 83 रुपये किलो आणि धर्मपुरीमध्ये 75 रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत आहे.
याचबरोबर, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये टोमॅटो 77 रुपये किलो, तिरुपतीमध्ये 72 रुपये किलो, तेलंगणातील वारंगलमध्ये 85 रुपये किलो आणि पुद्दुचेरीमध्ये 85 रुपये किलो दर मिळाला. दुसरीकडे, मेट्रो शहरांच्या किमतींवर नजर टाकली तर सोमवारी मुंबईत 55 रुपये किलो, दिल्लीत 56 रुपये किलो, कोलकात्यात 78 रुपये किलो आणि चेन्नईत 83 रुपये किलोने टोमॅटो विकला गेला.