Join us

टोमॅटो स्वस्त अन् थाळी झाली मस्त! घरगुती गॅस सिलिंडरची किंमतही घटल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 6:47 AM

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे भारतातील शाकाहारी जेवणाची थाळी सप्टेंबरमध्ये स्वस्त झाली.

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे भारतातील शाकाहारी जेवणाची थाळी सप्टेंबरमध्ये स्वस्त झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्स’ने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. या अहवालानुसार, आदल्या महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये शाकाहारी थाळी १७ टक्के.

थाळीच्या एकूण खर्चात १४ ते ८ टक्के योगदान इंधनाच्या दराचे असते. या खर्चात सप्टेंबरमध्ये १८ टक्के घसरण झाली. कारण घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १,१०३ रुपयांवरून घटून  ९०३ रुपये झाली आहे.

६२% टोमॅटोचे दर घटले

टोमॅटोचे दर आदल्या महिन्याच्या तुलनेत ६२ टक्के घटून ३९ रुपये किलो झाले. ऑगस्टमध्ये ते १०२ रुपये किलो होते. थाळीच्या किमतीतील घसरणीचे हे प्रमुख कारण आहे, असे अहवालात म्हटले आहे.

कांदा रडवणार : सप्टेंबर २०२३ मध्ये कांद्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के वाढले. हाच दर पुढे कायम राहण्याची शक्यता आहे. कारण यंदा खरीप हंगामातील कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत झाली किरकोळ घट

अहवालानुसार, वार्षिक आधारावर म्हणजेच गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये मात्र शाकाहारी थाळी नाममात्र १ टक्का स्वस्त झाली आहे.

पामतेला व गव्हाच्या किमती वाढल्यामुळे मांसाहारी थाळी ०.६५ टक्के महाग झाली आहे.