Pan-Aadhaar Linking : आयकर विभागानं आधार कार्ड आणि पॅन कार्ड (PAN-Aadhaar Linking) लिंक करण्यासाठी ३० जून २०२३ ही अंतिम मुदत दिली आहे. जर एखाद्या व्यक्तीनं ३० जूनच्या अंतिम मुदतीपर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही तर त्यांचा पॅन निष्क्रिय होईल.
म्हणजेच त्यांना अनेक सरकारी आणि निमसरकारी कामांसाठी महत्त्वाचं कागदपत्र म्हणून पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी कामासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परंतु आयकर विभागानं यातून काही श्रेणींना सूट दिली आहे. त्यांच्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत ही ३० जून नसेल.
लिंक करण्याची गरज कोणाला?
आयकर कायदा, १९६१ च्या कलम १३९एए नुसार, प्रत्येक व्यक्ती ज्याला १ जुलै २०१७ रोजी पॅन जारी करण्यात आले आहे आणि जो आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र आहे, त्यांनी ३० जूनच्या अंतिम मुदतीच्या आत आपला आधार पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे.
जर तुम्ही या मुदतीपर्यंत पॅन लिंक केलं नाही तर पॅन निष्क्रिय होईल. यापूर्वी अनेकदा याला मुदतवाढ देण्यात आली होती. जर यावेळीही मुदतवाढ देण्यात आली तर आधार पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळू शकतो.
कोणाला अनिवार्य नाही?
आधार आणि पॅन लिंक करणं या चार श्रेणींना लागू होणार नाही...
- आसाम, जम्मू आणि काश्मीर आणि मेघालय राज्यांतील रहिवासी.
- आयकर कायदा, १९६१ नुसार अनिवासी भारतीय (NRIs).
- कोणतीही व्यक्ती जी गेल्या वर्षात ८० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाची होती.
- अशा व्यक्ती ज्या भारताचे नागरिक नाहीत.
जे वरीलपैकी कोणत्याही श्रेणीमध्ये येतात त्यांनी ३० जून २०२३ पर्यंत त्यांचा पॅन आधारशी लिंक करणे आवश्यक नाही. परंतु त्यांना हवं असल्यास ते स्वेच्छेनं ते लिंक करू शकतात. या चार श्रेण्यांव्यतिरिक्त, सर्व व्यक्तींना ३० जूनपर्यंत त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे.
लिंक न केल्यास काय होणार?
- बर्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे की ३० जून २०२३ पर्यंत त्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर काय होईल? अशा परिस्थितीत करदात्यांचा पॅन निष्क्रिय केला जाईल.
- आता पॅन आधार लिंक करायचं असल्यास तुम्हाला विलंब शुल्क भरावं लागेल. आता पॅनला आधारशी लिंक केल्यास १००० रुपये विलंब शुल्क लागेल. म्हणूनच दिलेल्या मुदतीपूर्वी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणं चांगलं. त्यामुळे तुम्हाला इतर समस्या टाळता येतील.