मुंबई : चार वर्षाच्या मंदीनंतर भारतीय वाहन कंपन्यांसाठी गेले आर्थिक वर्ष दुहेरी आनंदाचे गेले आहे. याचे कारण म्हणजे देशांतर्गत बाजारपेठेत साडेसात टक्क्यांच्या विकासाची नोंद करणाऱ्या वाहन कंपन्यांनी त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने निर्यातीच्या माध्यमातून विक्री करत भक्कम नफ्याची नोंद केली आहे. भारतीय वाहन कंपन्या आणि भारतात कार्यरत परदेशी वाहन कंपन्या अशा दोघांच्या विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर देशांतर्गत विक्रीपेक्षा निर्यातीच्या माध्यमातून या कंपन्यांच्या वाहनांची विक्री अधिक झाल्याचे दिसून आले आहे. उपलब्ध माहितीनुसारस भारतात प्रकल्प असलेल्या फोर्ड, निसान, फोक्सवॅगन, जनरल मोटर्स या आणि अशाच काही प्रमुख ब्रँडच्या देशांतर्गत व निर्यातीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर अशाच प्रकारे निर्यात जास्त झाल्याचे दिसून येते. २०११-१२ या वर्षानंतर गेल्या आर्थिक वर्षात वाहन बाजारपेठेत प्रथमच इतकी तेजी दिसून आली आहे.काही प्रमुख कंपन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, फोर्ड इंडियाच्या निर्यातीमध्ये ३५.८६ टक्क्यांची वाढ होत कंपनीने ११०,८४० वाहनांची निर्यात केली तर या तुलनेमध्ये देशांतर्गत विक्रीमध्ये ६.३६ टक्क्यांची वाढ नोंदवित ७९ हजार ९४४ वाहनांची विक्री केलीआहे. जनरल मोर्टसने गेल्या आर्थिक वर्षात ३७,०८२ वाहनांची निर्यात केली तर त्यापेक्षा काहीशी कमी अर्थात ३२,५४० वाहनांची देशांतर्गत विक्री केली. फोक्सवॅगन आणि निसान कंपनीचीही स्थितीही अशीचआहे. वायू उत्सर्जनाची मर्यादा ओलांडत तब्बल ४० पट प्रदूषण करण्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या फोक्सवगॅन कंपनीने ७५ हजार ९८९ वाहनांची निर्यात केल्याचे वृत्त आहे. तर निसान कंपनीनेच्या निर्यातीच्या टक्केवारीत जरी सव्वा सात टक्क्यांची घट दिसून आली असली तरी, कंपनीने देशांतर्गत विक्री केलेल्या ३९,३८९ वाहनांच्या विक्रीपेक्षा १११, ६१२ अशी निर्यात झालेल्या वाहनांची संख्या कितीतरी अधिक आहे.कुशल मनुष्यबळ आणि अन्य विकसित देशांच्या तुलनेत कमी उत्पादन खर्च यामुळे अनेक परदेशी कंपन्यांनी भारतात उत्पादनास प्राधान्य दिली आहे. त्यामुळेच या निर्यातीत झपाट्याने झाल्याचे विश्लेषण वाहनतज्ज्ञांनी केले आहे. (प्रतिनिधी)
वाहनांच्या निर्यातीचा ‘टॉप गिअर’...!
By admin | Published: April 23, 2016 3:23 AM