Join us

दुचाकी विक्रीचा टॉप गिअर; गेल्या वर्षी राज्यात १३ लाख नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 8:07 AM

लॉकडाऊनमध्ये होता खडखडाट, लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर विविध कारणांमुळे वाहन खरेदीकडे ओघ वाढला

मुंबई :  दिवसेंदिवस वाहन खरेदीची संख्या वाढत आहे. २०२१-२२ या वर्षांत राज्यात १९ लाखांपेक्षा अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक खरेदी दुचाकींची झाली आहे. कोरोनामुळे  मार्च २०२० पासून लॉकडाउन लावण्यात आले होते. त्यामुळे वाहन खरेदी कमी झाली. वाहन नोंदणीच होऊ न शकल्याने एप्रिल २०२० ते जून २०२० पर्यंत आरटीओच्या तिजोरीत खडखडाट होता. 

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर विविध कारणांमुळे वाहन खरेदीकडे ओघ वाढला. अनेकांनी वाहतुकीसाठी रेल्वे, सरकारी परिवहन सेवा किंवा खासगी बस याचा पर्याय निवडण्याऐवजी दुचाकी, चारचाकी खरेदीवर भर दिला. त्यामुळे अन्य क्षेत्रांच्या तुलनेत वाहन उद्योग क्षेत्र उभारी घेत असल्याचे चित्र होते. मात्र, मार्च २०२१ पासून वाढलेला कोरोनाचा संसर्ग आणि त्यानंतर लावण्यात आलेले निर्बंध यामुळे या क्षेत्राची चाके पुन्हा रुतली. याचा परिणाम आरटीओच्याही (प्रादेशिक परिवहन कार्यालय) महसुलावर झाला. मात्र, कोरोनाची दुसरी लाटही ओसरताच हळूहळू निर्बंध शिथिल झाले आणि राज्यातील वाहन खरेदीत पुन्हा वाढ होऊ लागली.  २०२०-२१ मध्ये १६ लाख ९६ हजार ७५० नवीन वाहनांची खरेदी झाली असून, यामध्ये १२ लाख २४ हजार ७९७ दुचाकी, तर ३ लाख ७५ हजार ४९७ चारचाकी वाहने आहेत. 

नंतरच्या आर्थिक वर्षांत वाहनांच्या खरेदीत वाढ झाली. २०२१-२२ मध्ये १९ लाख ११ हजार ९३४ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. दुचाकी वाहन खरेदीतही ही वाढ असून, १३ लाख ११ हजार ५२६ दुचाकींची विक्री झाली, तर ४ लाख ५७ हजार ३२५ चारचाकी वाहने आहेत, तर जड, अवजड वाहने, कमी क्षमतेच्या मालवाहतुकीची वाहने, तीनचाकी वाहने, प्रवासी बस अशा अन्य वाहनांचीही खरेदी झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्याच्या घडीला ३ कोटी १५ लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर धावत आहेत.