नवी दिल्ली : जून महिन्यात भारतातील कार उत्पादक कंपन्यांनी संमिश्र कल दर्शविला. देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कार विक्रीत ३३.५ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असताना ह्युंदाई आणि जनरल मोटर्स या प्रमुख कंपन्यांची विक्री मात्र घटली आहे.
जून महिन्यात मारुती सुझुकीने एकूण १,१२,७७३ कार विकल्या. गेल्या वर्षी या काळात ८४,४५५ कार विकल्या गेल्या होत्या. मे महिन्यात मारुतीच्या कार विक्रीत ३१.१ टक्क्यांची वाढ होऊन १,००,९६४ कार विकल्या गेल्या होत्या. २०१३ च्या मे महिन्यात ही विक्री ७७,००२ कार इतकी होती.
मारुती ८००, आॅल्टो, ए-स्टार आणि वॅगनआर या छोट्या गाड्यांच्या विक्रीत सर्वाधिक ५२.१ टक्क्यांनी वाढ झाली. ४७,६१८ गाड्या कंपनीने विकल्या. आदल्या वर्षी हा आकडा ३१,३१४ होता. स्विफ्ट आणि इतर कॉम्पॅक्ट कारच्या विक्रीत ६.२ टक्के, डिझायरच्या विक्रीत २७.८ टक्के, मध्यम आकाराच्या एसएक्स४च्या विक्रीत २.५ टक्के वाढ झाली. जिप्सी आणि इतर युटिलिटी गाड्यांच्या विक्रीत अल्प वाढ नोंदली गेली. ओम्नी व्हॅनच्या विक्रीत ४२.५ टक्के वाढ झाली. कंपनीची निर्यातही ५८.४ टक्के वाढली आहे.
जनरल मोटर्सला फटका
जून महिन्यात जनरल मोटर्सच्या कार विक्रीत २१ टक्क्यांची घट झाली आहे. अवघी ५,१७२ वाहने कंपनीला या महिन्यात विकता आली. आदल्या वर्षी कंपनीने ६,५७५ वाहने विकली होती. बीट, तवेरा या गाड्या कंपनी भारतात प्रामुख्याने विकते.
ह्युंदाईच्या विक्रीत ७.६ टक्के घट
ह्युंदाईच्या गाड्यांच्या विक्रीत जून महिन्यात ७.६ टक्के घट झाली आहे. ५०,५१६ कार कंपनीने विकल्या. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये कंपनीच्या ५४,६६५ कार विकल्या गेल्या होत्या. ह्युंदाईच्या निर्यातीतही २९.३ टक्के घट झाली आहे. १७,००४ कार जूनमध्ये निर्यात झाल्या. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये २४,०५५ कार निर्यात करण्यात आल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मारुती-सुझुकीचा कार विक्रीत टॉप गीअर
जून महिन्यात भारतातील कार उत्पादक कंपन्यांनी संमिश्र कल दर्शविला. देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कार विक्रीत ३३.५ टक्क्यांची घसघशीत वाढ
By admin | Published: July 2, 2014 04:05 AM2014-07-02T04:05:48+5:302014-07-02T04:05:48+5:30