नवी दिल्ली : मारुती सुझुकीची विटारा ब्रेजा आणि ह्युंदाईच्या क्रेटासह अन्य युटिलिटी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याने जुलै महिन्यात कार विक्रीत ९.६२ टक्क्यांची वाढ झाली. एकूण प्रवासी वाहनांची विक्री १६.७८ टक्क्यांनी वाढली.वाहन उत्पादक कंपन्यांची संघटना सियामने ही आकडेवारी जारी केली. एकूण २,५९,६८५ प्रवासी वाहनांची विक्री जुलैमध्ये झाली. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये २,२२,३६८ वाहनांची विक्री झाली होती. सियामचे उप-महासचिव सुगातो सेन यांनी पत्रकारांना सांगितले की, युटिलिटी वाहन क्षेत्रात नवे मॉडेल दाखल झाल्यामुळे उत्साह पाहायला मिळाला. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि उत्तम मान्सून याचाही सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. प्रवासी वाहनांच्या विक्रीत युटिलिटी वाहनांचा वाटा सर्वाधिक राहिला. युटिलिटी वाहनांची विक्री ४१.८५ टक्क्यांनी वाढली. ६४,१0५ युटिलिटी वाहने या महिन्यात विकली गेली. गेल्या वर्षी हा आकडा ४५,१९१ वाहने इतका होता. सेन यांनी सांगितले की, ‘आॅक्टोबर २0१५पासून प्रवासी वाहनांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. जुलैमध्ये १,७७,६0४ कारची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये १,६२,0२२ कार विकल्या गेल्या होत्या. दोन महिन्यांत कार विक्रीत घसरण झाली होती. त्यानंतर, जुलैमध्ये ती पुन्हा वाढली आहे. ग्राहक युटिलिटी वाहनांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
कार विक्रीचा ‘टॉप गीअर’!
By admin | Published: August 11, 2016 2:10 AM