Join us  

Gautam Adani Group, Total Energies: शेअर्सचा भाव वधारत असतानाच अदानींना विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 10:39 AM

विदेशातील गुंतवणूकदारांच्या या निर्णयामुळे अदानींच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता

Gautam Adani Group, Total Energies: गेल्या दोन दिवसांपासून भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यवसायावरील अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या आरोपांमुळे झालेला परिणाम कमी होताना दिसत आहे. याचा अंदाज अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झपाट्याने झालेल्या वाढीवरून नक्कीच लावता येऊ शकतो. पण शेअर्समध्ये झालेली वाढ आणि नेटवर्थमध्ये वाढ होत असतानाच त्यांच्यासाठी परदेशातून एक वाईट बातमी आली आहे. एका मोठ्या फ्रेंच कंपनीने अदानींच्या प्रकल्पातील $५० बिलियनची गुंतवणूक रोखून धरली आहे.

$५० अब्ज गुंतवणूक

अदानी समूहाला फ्रान्सच्या टोटल एनर्जीचा मोठा झटका बसला आहे. अदानींच्या कंपनीच्या सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणूकदाराने एक निवेदन जारी केले आहे की त्यांनी अदानी समूहाच्या $५० अब्ज हायड्रोजन प्रकल्पातील गुंतवणूक रोखून धरली आहे. बिझनेस स्टँडर्डवरील रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टोटल एनर्जीने म्हटले आहे की, US स्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अदानी ग्रुपवर लावण्यात आलेल्या आरोपांचे ऑडिट निकाल येईपर्यंत करारावर स्वाक्षरी केली जाणार नाही.

२५% स्टेक घेण्याची केली होती घोषणा

गेल्या वर्षी जून 2022 मध्ये केलेल्या घोषणेनुसार, फ्रेंच फर्म Total Energies अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) मध्ये 25 टक्के इक्विटी स्टेक घेणार होती. या विदेशी कंपनीला ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम विकसित करण्याच्या उद्देशाने $५० अब्ज गुंतवणुकीसह २०३० सालापर्यंत १० लाख टन हरित ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठायचे आहे. तथापि, या करारावर अद्याप स्वाक्षरी झाली नव्हती आणि त्याआधी हिंडनबर्ग संशोधन अहवालाने खळबळ उडवून दिली. या अहवालाचा परिणाम या मोठ्या प्रकल्पावरही स्पष्टपणे दिसून येत आहे.

फ्रेंच फर्मच्या CEO ने दिली माहिती

हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांबाबत अदानी समूहाकडून स्पष्टता येईपर्यंत आम्ही हा हायड्रोजन प्रकल्प थांबवला आहे, असे टोटल एनर्जीचे सीईओ पॅट्रिक पौयाने यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी सांगितले की या प्रकल्पाची घोषणा झाली होती, परंतु अद्याप करारावर स्वाक्षरी झालेली नाही. जोपर्यंत या प्रकरणी संपूर्ण स्पष्टता येत नाही, तोपर्यंत गुंतवणूक रोखण्यात आली आहे. टोटल एनर्जीच्या सीईओच्या या वक्तव्यानंतर अदानी समूहाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

टॅग्स :अदानीशेअर बाजार