नवी दिल्ली : काेराेनाच्या पहिल्या लाटेतून जेमतेम सावरण्याच्या स्थितीत आलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला दुसऱ्या लाटेने धक्का दिला. त्यामुळे माेठ्या प्रमाणावर प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी आर्थिक पॅकेज देण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे अनेक राज्यांनी लाॅकडाऊन तसेच कडक निर्बंध लावले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा ब्रेक लागला. अनेक क्षेत्र पुन्हा प्रभावित झाली आहेत. त्यांच्यासाठी पॅकेज देण्याची तयारी सुरू आहे. सध्या ही चर्चा प्राथमिक टप्प्यात असून, याबाबत कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
या क्षेत्रांना फटका
वाहन उद्याेग, पर्यटन, नागरी विमानसेवा तसेच आदरातिथ्य क्षेत्राला फटका बसला आहे. याशिवाय अनेक लघु आणि मध्यम कंपन्यांचेही नुकसान झाले आहे. लाॅकडाऊनमुळे अनेक कंपन्यांना नव्या आर्थिक वर्षात खर्चात कपात करावी लागली आहे. त्यामुळे बेराेजगारीतही वाढ झाली आहे.
सरकारचे हात बांधलेले
सरकारचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे करांमध्ये काही सवलती देण्यापलीकडे जास्त काही करता येण्याची शक्यता कमीच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.