Tourism in Kashmir : काश्मीरला भारताच्या निसर्ग सौंदर्याचा ताज म्हटलं जातं. याचा आनंद लुटण्यासाठी देशच नाही तर जगभरातून पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पर्यटनावरच इथली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र, मंगळवारी काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात इतर राज्यातील लोकांना आपले प्राण गमवावे लागले. परंतु, याचा सर्वात मोठा आर्थिक फटका स्थानिक लोकांना बसणार आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटक इतके घाबरले आहेत की त्यांनी पुढील ४-५ महिन्यांसाठी त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, याचा थेट परिणाम स्थानिक काश्मिरी लोकांवर आणि तेथील अर्थव्यवस्थेवर होईल.
आता कुठं काश्मीर रुळावर येत होतं...मोदी सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यास बराच काळ गेला. येथे अनेक आर्थिक उपक्रम सुरू करण्यात आले. यामुळे काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली होती. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वतः सांगितले होते की २०२४ मध्ये २.३५ कोटी पर्यटक काश्मीर खोऱ्यात आले, जे २०२३ मध्ये २.११ कोटी होते. २०२२ मध्ये १.८९ कोटी पर्यटक काश्मीरला भेट देण्यासाठी आले होते. २०२१ मध्ये १.१३ कोटी पर्यटक आणि २०२० मध्ये ३४ लाख पर्यटकांनी काश्मीर खोऱ्याला भेट दिली. आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की तिथे पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे, ज्याचा फायदा राज्याच्या अर्थव्यवस्थेला तसेच खालच्या स्तरातील सामान्य माणसाला होत आहे.
पर्यटकांकडून काश्मीर सहल रद्दया दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. कारण मोठ्या संख्येने पर्यटकांनी त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. एका टूर्स अँड ट्रॅव्हलच्या ऑपरेशन्स हेड यांनी सांगितलं की, पहलगाम हल्ल्यानंतर, मला पुढील ४-५ महिन्यांसाठी सर्व बुकिंग रद्द करण्याचे फोन येत आहेत. या हल्ल्यामुळे स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनाचे मोठे नुकसान होईल. यात स्थानिक हॉटेल्स, विमान, रेल्वे बुकिंग रद्द करण्यात येत आहे.
हॉटेल उद्योगाला मोठा धक्काकोरोना काळामुळे २ वर्षे ठप्प असलेला काश्मीरचा हॉटेल उद्योग अद्याप नीट उभा राहू शकला नव्हता. अशा परिस्थितीत आता दहशतवादी हल्ल्यानंतर हॉटेल बुकिंग रद्द होऊ लागले आहेत. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा ज्योती मयाल म्हणतात की, काश्मीरमध्ये हॉटेल रद्द करण्यासाठी लोकांचे फोनवर फोन येत आहेत. उन्हाळ्यात काश्मीरचे पर्यटन उच्चांकावर असते. पण, या हल्ल्यानंतर बुकिंग खूप वेगाने रद्द होत आहेत. हॉटेल व्यवसायावर पुन्हा संकटाचे ढग दाटू लागले आहेत.
वाचा - 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?जम्मू आणि काश्मीरच्या एकूण अर्थव्यवस्थेत केवळ पर्यटनाचा वाटा ८ टक्के आहे. २०२४-२५ मध्ये, राज्याचा जीडीपी ७ टक्क्यांहून अधिक दराने वाढत होता, ज्यामध्ये पर्यटन क्षेत्राने सर्वात जलद वाढ केली होती. २०२४ मध्ये गेल्या वर्षी काश्मीरचा पर्यटन उद्योग १२ हजार कोटी रुपयांचा होता, जो २०३० पर्यंत २५ ते ३० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी फक्त गुलमर्गमधून १०३ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला होता.