नवी दिल्ली - जगभरात आपल्या नाविण्यपूर्ण कारच्या माडेल्समुळे प्रसिद्ध असलेल्या टोयोटा कंपनीने इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर मॉडेल्सच्या एकूण 2628 गाड्या परत मागवल्या आहेत. या गाड्यांच्या फ्यूल होज राऊटींगमध्ये खराबी आढळून आली आहे. त्यामुळे या गाड्यांची तपासणी करण्यासाठी कंपनीने तब्बल 2628 गाड्यांची वापसी करण्यास सांगितले. या गाड्यांमध्ये बिघाड असल्यास त्यांची दुरुस्ती करुन ग्राहकांना त्या परत करण्यात येणार आहेत.
कंपनीच्या या घोषणेनुसार 18 जुलै 2016 ते 22 जुलै 2018 या कालावधीत तयार केलेल्या पेट्रोल इंजिनवाल्या इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर या गाड्यांना परत मागविण्यात आले आहे. कंपनीकडून नेहमीच ग्राहकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येते. ग्राहकांचे समाधान हीच आमच्या व्यवसायाची कटिबद्धता असल्याचे टोयोटा किलोस्कर मोटर्सने म्हटले आहे. या सेवेसाठी ग्राहकांना एक रुपयाचाही खर्च करावा लागणार नाही. कंपनीकडून फ्यूल होज राऊटींगची ही तपासणी मोफत करण्यात येत आहे. तसेच यामध्ये बिघाड आढळल्यास तेही मोफतच बदलून देण्यात येईल. दरम्यान, यापूर्वी एप्रिल 2016 ते जानेवारी 2018 या कालवधीत उत्पादित केलेल्या इनोव्हा क्रिस्टा या गाड्यांची वापसी केली होती. या गाड्यांच्या वायर हॉर्नमध्ये हलकासा बिघाड झाल्याची तक्रार होती.