Trump Tariff : अमेरिका आणि चीनमध्येटॅरिफ युद्धाचा भडका उडाला आहे. दोघेही माघार घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. शुक्वारी ट्रम्प यांनी चीनवर तब्बल १४५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. यावर चीननेही जसास तसे उत्तर देत अमेरिकी मालावर १२५ टक्के शुल्क लादले आहे. दुसरीकडे टॅरिफ रोखण्यासाठी चीनने एक नामी शक्कल लढवली आहे. चीनसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेला लागणारे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग चीन निर्यात करतो. अमेरिकेचे शुल्क टाळण्यासाठी चीनने आता व्हिएतनाम या देशाचा आधार घेतला आहे.
चिनी वस्तूंवर 'मेड इन व्हिएतनाम' लेबल
टॅरिफवर उतारा म्हणून चीनने आता व्हिएतनाममार्गे आपल्या वस्तूंची अमेरिकेत निर्यात सुरू केली आहे. ट्रम्प प्रशासन व्हिएतनामच्या वस्तूंवर कमी आयात शुल्क आकारते. याचाच फायदा घेत चिनी वस्तूंवर 'मेड इन व्हिएतनाम' लेबल लावून विकल जात आहे. यापूर्वीच, व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी व्हिएतनाममधून निर्यात होणाऱ्या चिनी वस्तूंबद्दल चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिएतनामवर ४६ टक्के कर लादला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी चीन वगळता उर्वरित जगाला ९० दिवसांसाठी आयात शुल्कातून सूट दिली आहे. बुधवारी व्हिएतनामी उपपंतप्रधान आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी शुल्काबाबत वाटाघाटी करण्यास सहमती दर्शविली आहे.
व्हिएतनामला टॅरिफ कपातीची अपेक्षा
या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन लोकांच्या मते, व्हिएतनाम २२-२८ टक्के दरांची अपेक्षा करत आहे. गुरुवारी अमेरिकेसोबत व्यापार चर्चा सुरू करण्याची घोषणा करताना, व्हिएतनामी सरकारने त्यांच्या अधिकृत पोर्टलवर म्हटले आहे की 'ट्रेड फ्रॉड' रोखली जाईल. याचा अर्थ यापुढे चीनची ही हुशारी आम्ही चालू देणार नाही.
वाचा - 'मला कशासाठीही मस्कची गरज नाही' ट्रम्प आणि इलॉनमध्ये वादाची ठिणगी? व्हिडीओ व्हायरल
व्हिएतनामसाठी अमेरिकन बाजारपेठ महत्त्वाची
अलीकडेच ट्रम्प यांनी म्हटले होते की व्हिएतनाम सरकारला टॅरिफबाबत एक करार करायचा आहे. त्यांना अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ शून्य करायचा आहे. गेल्या शुक्रवारी, व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लाम यांच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती देताना ट्रम्प म्हणाले की व्हिएतनामला शुल्क शून्यावर आणायचे आहे. व्हिएतनामसाठी अमेरिकन बाजारपेठ खूप महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी व्हिएतनामने अमेरिकेतून १३७ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या, जे त्यांच्या जीडीपीच्या ३० टक्के इतके आहे.