डॉ. पुष्कर कुलकर्णीबाजारात जे ट्रेडर्स सक्रिय असतात किंवा पोझिशनल ट्रेडच्या माध्यमातून पैसे गुंतवतात त्यांच्यासाठी सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल हा महत्वाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. तसेच नव्याने दीर्घ कालीन गुंतवणूक करायची असेल आणि निवडलेल्या कंपनीच्या शेअरचे बाजार मूल्य जास्त असेल तर नव्याने एंट्री करायची असल्यास अशा गुंतवणूकदारांना सुद्धा याचा अभ्यास करावा. कंपनीचा शेअर, निफ्टी, बँक निफ्टी आणि बीएसई इंडेक्स यास सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल लागू होते.
सपोर्ट लेव्हल म्हणजे काय?शेअरची विक्री होऊन जर भाव खाली येत असेल तर खालच्या पातळीवर ज्या भावाचा आधार घेत पुन्हा खरेदी सुरु होते त्या भाव पातळीला सपोर्ट लेव्हल असे म्हणतात. बाजार तज्ज्ञ चार्ट्सचा अभ्यास करून सपोर्ट लेव्हल ठरवितात. ही सपोर्ट पातळी निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स याची सुद्धा काढली जाते. ऑप्शन ट्रेड करणाऱ्यांना याचा विशेष फायदा होतो.
सपोर्ट पातळी नेमकी कशी ठरवितात? शेअरचा भाव वर खाली होत असताना अनेक वेळा ज्या भावाचा आधार घेत शेअर मध्ये पुन्हा खरेदी होते ती भाव पातळी चार्ट वरून काढली जाते आणि त्या पातळीस सपोर्ट लेव्हल म्हणून ठरविली जाते.
रेझिस्टन्स लेव्हल म्हणजे काय? शेअरमध्ये खरेदी होते आणि भाव वर सरकत असतो. परांतून वरील भावात शेअरची पुन्हा विक्री होते आणि नफा वसुली होत असते. एखादी पातळी जी वरच्या दिशेला असते आणि वारंवार त्या ती पातळी गाठून त्या वर न जाता विक्रीचा मारा सुरु होतो त्या भाव पातळीस रेझिस्टन्स लेवल असे म्हणतात.
रेझिस्टन्स पातळी नेमकी कशी ठरवितात?शेअरच्या चार्ट वर पूर्वीच्या वाढलेल्या म्हणजेच उच्चतम भावात शेअर पोचतो आणि पुन्हा विक्रीने भाव खाली येतो अशी पातळी जी एक किंवा अधिक वेळेस चार्टवर पाहावयास मिळते तो शेअरचा भाव म्हणजेच रेझिस्टन्स पातळी. ही रेझिस्टन्स पातळी निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स याची सुद्धा काढली जाते. उदा निफ्टी १९ ऑक्टोबर रोजी १८,६०४ या पातळीवर पोचला होता. म्हणजे जर निफ्टीमध्ये पुन्हा वाढ सुरु झाली तर त्याची उच्चतम् रेझिस्टन्स पातळी ही १८,६०० ची असेल.
ब्रेक आऊट आणि ब्रेक डाऊन कोणत्याही कंपनीचा शेअर, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स यास ब्रेक आऊट आणि ब्रेकडाऊन लागू होते. जेव्हा भाव खाली येतो तेव्हा सर्व प्रथम सपोर्ट लेव्हल गाठली जाते. याचा आधार घेत जर पुन्हा खरेदी झाली तर भाव वाढतो. सपोर्ट लेव्हल वर जर बराच काळ भाव रेंगाळत असेल तर एक तर त्याचा आधार घेत भाव जर वर सरकला नाही आणि बाजारात जर बेअरीश ट्रेंड असेल तर ही सपोर्ट पातळी तोडून भाव पुन्हा खालच्या दिशेला जातो याच ब्रेक डाऊन म्हणतात. मग अशा परिस्थितीत भाव खालच्या सपोर्ट लेव्हल पर्यंत खाली येऊ शकतो. याच उलट जर भाव रेझिस्टन्स पातळीवर रेंगाळत असेल आणि बाजार बुलिश असेल तर रेझिस्टन्स पातळी तोडून भाव पुन्हा नवीन उच्चतमपातळी गाठतो त्यास ब्रेक आऊट असे म्हणतात. हे जसे निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सला लागू असते तसेच प्रत्येक शेअरच्या बाबतीत सुद्धाही लागू असते. यात सर्वसामान्य तिमाही, वार्षिक निकाल आणि कंपनीच्या एकूण कामगिरीवर ब्रेक आऊट किंवा ब्रेकडाऊन अनुभवायास मिळते.
मागील दोन भागात आपण टेक्निकल अनॅलिसिस जाणून घेतले. टेक्निकल अनॅलिसिसचा अभ्यास गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांचेसाठी एक महत्वाचा आहे. हा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी अनेक संस्था त्याचा कोर्स देऊ करतात. बाजारात उतरताना जर टेक्निकल अनॅलिसिस चा अभ्यास केला तर संभाव्य धोके कमी करता येतात आणि बाजारातून अधिक नफा कमविण्यासाठीच्या संधी वाढतात. पुढील भागात आपण कॅपिटल गेन टॅक्स संदर्भात जाणून घेऊ. (क्रमशः)
हेही वाचा -
म्युच्युअल फंडात गुंतवावे का, थेट शेअर बाजारात उतरावे?अचूक शेअर निवडण्याचा 'फंडा'; कंपनीचे 'फंडामेंटल' पाहून 'गणित' मांडा!
टेक्निकल ॲनालिसिस... 'ट्रेडिंग'मधून पैसे कमावण्याचं भारी 'टेक्निक', समजून घ्या 'चार्ट की बात'