नवी दिल्ली - देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला होता. अर्थमंत्री भाजीमंडईत जाऊन भाजी खरेदी करतानाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. अर्थमंत्र्यांनी स्वत: मंडईत जाऊन हाताने निवडून भाजी खरेदी केली होती. आता, निर्मला सितारमण यांचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे. बजेटच्या ४ दिवस अगोदर म्हणजेच आज प्रजासत्ताक दिनी निर्मला सितारमण यांनी हलवा समारंभात सहभागी होत स्वीट डिशची चव चाखली. यावेळी, इतरही मंत्रीगण त्यांच्यासोबत या समारंभात उपस्थित होते.
अर्थमंत्री सितारमण २०२३-२४ साठी ३१ डिसेंबर रोजी अर्थसंकल्प सादर करत आहेत. या बजेट सेशनपूर्वी संसदेत हलवा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्राच्या बजेटच्या दस्तावेजांची छपाई सुरू करण्याच्या मुहूर्तावर हलवा समारंभाचे आयोजन करण्यात येते. या समारंभासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह अर्थ मंत्रालयातील इतरही अधिकारी उपस्थित होते.
चांगल्या सुरुवातीच्या शुभ मुहूर्तावर हलवा समारंभ हा संसदेतील परंपरागत बजेटपूर्व कार्यक्रम आहे. बजेटचा दस्तावेज छापण्यापूर्वी हा कार्यक्रम साजरा केला जातो. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेली नवीन वर्षाचं बजेट बनविण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आनंदी आणि काम फत्ते झाल्याचे सेलिब्रेशन म्हणून हा हलवा समारंभ साजरा केला जातो. या समारंभातील स्वीट डीश खाल्ल्यानंतर बेजटला हिरवा कंदील दर्शवला जातो. हा समारंभ अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये केला जातो, जिथे एक प्रिंटींग प्रेस आहे.