Join us

आपल्या मर्जीने चॅनेल न निवडणाऱ्यांना आता मिळणार 'बेस्ट फिट प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 1:23 PM

जे ग्राहक 31 मेपर्यंत आवडीच्या वाहिन्यांची निवड करणार नाहीत, त्यांना बेस्ट फिट प्लॅनप्रमाणे टीव्ही पाहावा लागणार आहे. 

ठळक मुद्देजे ग्राहक 31 मेपर्यंत आवडीच्या चॅनलची निवड करणार नाहीत, त्यांना आता बेस्ट फिट प्लॅनप्रमाणे टीव्ही पाहावा लागणार आहे. बेस्ट फिट प्लॅन हा ग्राहकांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयीवर आधारीत असणार आहे. तसेच ग्राहक जे चॅनेल सर्वाधिक पाहतात त्याच चॅनलचा यामध्ये समावेश असणार आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये बदल करण्याचा एक पर्यायही देण्यात आला आहे. आतापर्यंत चॅनल पॅक न निवडलेल्या ग्राहकांसाठी बेस्ट फिट प्लॅन आहे. 

नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने काही दिवसांपूर्वी सर्व केबल आणि डीटीएच ऑपरेटर्ससाठी नवीन नियम जारी केले होते. आवडीचे चॅनल निवडण्यासंदर्भात ट्रायच्या नियमावलीला अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जे ग्राहक 31 मेपर्यंत आवडीच्या चॅनलची निवड करणार नाहीत, त्यांना आता बेस्ट फिट प्लॅनप्रमाणे टीव्ही पाहावा लागणार आहे. 

ज्या युजर्सनी आतापर्यंत आपला चॅनल पॅक निवडलेला नाही त्यांच्यासाठी डीटीएच आणि केबल कंपन्यांनी बेस्ट फिट प्लॅन तयार करा आणि तो लागू करा असं ट्रायने म्हटलं आहे. बेस्ट फिट प्लॅन हा ग्राहकांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयीवर आधारीत असणार आहे. तसेच ग्राहक जे चॅनेल सर्वाधिक पाहतात त्याच चॅनलचा यामध्ये समावेश असणार आहे. जर आतापर्यंत चॅनलचा प्लॅन सुरू केला नसेल तर तुमच्या अकाऊंटवर हा प्लॅन सुरू झाला आहे. ग्राहक ऑपरेटरच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून बेस्ट फिट प्लॅन सुरू झाला आहे की नाही ते पाहू शकतात. तसेच ग्राहकांना या प्लॅनमध्ये बदल करण्याचा एक पर्यायही देण्यात आला आहे. आतापर्यंत चॅनल पॅक न निवडलेल्या ग्राहकांसाठी बेस्ट फिट प्लॅन आहे. 

ट्रायने डीटीएच आणि केबल युजर्सना अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांच्या आवडीचे चॅनेल निवडून चॅनलचा एक पॅक तयार करायला सांगितलं होतं. यामध्ये युजर्स 130 रुपयाच्या नेटवर्क कॅपसिटी फी वर 100 चॅनल पाहू शकत होते. त्यावर त्यानंतर 18 टक्के जीएसटीसोबत 153 रुपयाचा पॅक होत होता. उपलब्ध 100 चॅनलमध्ये युजर्सना 25 दूरदर्शन चॅनल मोफत देण्यात आले होते. हे चॅनल युजर्स पॅकमधून काढू शकत नाही. सर्व केबल आणि डीटीएच कंपनींना आपल्या वेबसाईटवर चॅनलची एक लिस्ट आणि त्याची किंमत देण्याचे सांगण्यात आले होते. 

ट्रायच्या नियमावलीला तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता 31 मेपर्यंत संधी

31 डिसेंबरपासून ट्रायच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याला मुदतवाढ देऊन ही मुदत पहिल्यांदा 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. ग्राहकांचा अल्प प्रतिसाद आणि केबल चालकांसोबतचा तिढा सोडविला न गेल्याने ही मुदत दुसऱ्यांदा वाढवून 31 मार्चपर्यंत करण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवण्यात आली असून, 31 मेपर्यंत नवीन नियमावलीप्रमाणे आवडीच्या वाहिन्यांची यादी करून केबल चालकांना किंवा डीटीएच सेवा पुरवठादारांना देण्याची मुभा देण्यात आली आहे.

आधीपेक्षा दर वाढले

नवीन नियमावलीमुळे चॅनलची निवड करण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना मिळेल व पूर्वीच्या तुलनेत कमी रक्कम आकारली जाईल, असा दावा ट्रायने केला होता. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त रक्कम भरावी लागत असल्याने ग्राहकांमधून ट्रायच्या या नियमावलीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाहिन्यांची निवड करण्याची प्रक्रियादेखील क्लिष्ट असून ब्रॉडकास्टर्स व एमएसओनी विविध समूह तयार केले असले तरी एकाच समूहामध्ये आवडीच्या सर्व वाहिन्या मिळत नसल्याने अनेक समूह निवडावे लागत असल्याने टीव्ही पाहण्याचा दर प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

‘ग्राहकांवर अधिभार’

ग्राहकांच्या हिताचे नाव देऊन तयार करण्यात आलेल्या या नियमांचा फटका ग्राहकांना बसत आहे. ग्राहकांना अधिक रक्कम द्यावी लागत आहे. ट्राय जोपर्यंत केबल चालकांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन नियम बनवणार नाही तोपर्यंत गोंधळ सुरू राहण्याची भीती आहे, असे मत केबल ऑपरेटर अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युटर असोसिएशनच्या कोअर समिती (कोडा)चे सदस्य विनय (राजू) पाटील यांनी व्यक्त केले. कोडाने मागणी केलेल्या 3 महिन्यांच्या मुदतवाढीला ट्रायने मुदतवाढ देऊन आमच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा पाटील यांनी केला.

 

टॅग्स :ट्राय