Join us  

कुत्रे आणि मांजरांनाही ट्रेनमध्ये सहज प्रवास करता येणार; IRCTC ही सुविधा सुरू करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 10:54 AM

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कुत्रे आणि मांजरींसाठी तिकीट बुक करण्याचा अधिकार टीटीईला देण्याचाही विचार केला जात आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्राणीप्रेमींसाठी (Animal Lovers) आनंदाची बातमी आणली आहे. रेल्वे मंत्रालयाने आता कुत्रे-मांजरांसाठी (Dog-Cat) ऑनलाइन तिकीट बुकिंग (Online Ticket Booking) सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आपल्या पाळीव प्राण्यांना ट्रेनमध्ये (Train) घेऊन जाऊ शकतील. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कुत्रे आणि मांजरींसाठी तिकीट बुक करण्याचा अधिकार टीटीईला देण्याचाही विचार केला जात आहे. त्यामुळे आता प्राणीप्रेमी AC-1 क्लासमध्ये कुत्रे आणि मांजरींसाठीही तिकीट काढू शकतात. 

आतापर्यंत प्रवाशांना त्यांचे पाळीव कुत्रे किंवा मांजर सेकंड क्लासच्या सामान आणि ब्रेक व्हॅनमध्ये डॉग बॉक्समध्ये नेण्याची परवानगी होती. याशिवाय, आतापर्यंत प्राणीप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांना ट्रेनमध्ये नेण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या पार्सल बुकिंग काउंटरवर तिकीट बुक करावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालय आता कुत्रे आणि मांजरांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात येत आहे. यामुळे पाळीव प्राण्यांच्या ऑनलाइन बुकिंगची सुविधा सुरू करता येऊ शकेल.

अलीकडे, रेल्वेने वैधानिक संस्थेने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास प्रवाशांना आपल्या पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करणे सोयीचे केले आहे. हत्तीपासून घोडे, कुत्रे, पक्षी अशा सर्व आकाराच्या प्राण्यांसाठी नियम जाहीर केले आहेत. कुत्रे आणि मांजर यांसारखे पाळीव प्राणी प्रवासात आपल्या मालकांसोबत जाऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याला भारतीय रेल्वेच्या प्रवासात घेऊन जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला रेल्वेचे काही नियम पाळणे आवश्यक आहे.

दरम्यान, पूर्वी प्रवाशांना फक्त पाळीव प्राणी घेऊन जाण्यासाठी एसी फर्स्ट क्लास आणि फर्स्ट क्लास डब्यांमध्ये दोन किंवा चार बर्थसह पूर्ण कूप बुक करावे लागत होते. त्यासाठीची फीही जास्त होती. पाळीव प्राणी बुक केलेले आढळले नाही, तर जबरदस्त दंड आकारण्याची तरतूद होती. टीटीई अशा प्रवाशांकडून तिकीट दराच्या सहापट पैसे घेत होते. तसेच, आतापर्यंत प्रवाशांना एसी टू-टायर, एसी थ्री-टायर, एसी चेअर कार, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास डब्यांमध्ये पाळीव प्राणी नेण्याची परवानगी नव्हती.

टॅग्स :रेल्वेकुत्रा