मेट्रो रेल्वेला मिहानची ३७.४ हेक्टर जागा हस्तांतरित
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM
- खापरी मेट्रो डेपो : जागेचे सर्वेक्षण जोरातनागपूर : जलद परिवहनासाठी नागपुरात लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी आवश्यक जागेचे सर्वेक्षण जोरात सुरू आहे. खापरी मेट्रो डेपोसाठी आवश्यक ३७.४ हेक्टर जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे बुधवारी मिहानच्या अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्याकडे सुपूर्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी चिचभुवन परिसरात संरेखनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या ठिकाणी मेट्रो मार्गासाठी २० मीटर रुंद जागा मोकळी करण्यात येत आहे. एकूण ३८.२१५ कि़मी. लांबीच्या मार्गांपैकी मेट्रो रेल्वे ३३.६१५ कि़मी. मार्गावर वरून (एलिव्हेटेड), तर ४.५ कि़मी. अंतरापर्यंत जमीन पातळीवर असणार आहे. मार्ग-१ वर जागेचे हस्तांतरणआज हस्तांतरित केलेली जागा नागपूर विमानतळ ते खापरी या मार्गावर आहे. या ठिकाणी मेट्रो रेल्वेचा डेपो राहील. हा डेपो मेट्रोच्या मार्ग-१ वर आहे. हा मार्ग उत्तर-दक्षिण असा असून ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान, विमानतळमार्गे खापरी मेट्रो डेपो असा राहील. या मार्गावर ऑटोमोटिव्ह, नारी रोड, इंदोरा, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, कस्तुरचंद पार्क, शून्य मैल, सीताबर्डी, काँग्रेसनगर, रहाटे कॉलनी, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाशनगर, उज्जवलनगर, जुने विमानतळ, नवे विमानतळ, खापरी मेट्रो डेपो अशी एकूण १७ स्थानके राहतील.जागेचे सर्वेक्षण जोरातएकूण ३६ कि़मी.चा दोन मार्गे आणि बांधकामाच्या पूर्णत्वापर्यंत ८,९०० कोटींची गुंतवणूक असलेल्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी सध्या जागेचे सर्वेक्षण जोरात सुरू आहे. दोन्ही मार्गासाठी २०-२० अधिकारी कार्यरत आहेत. कामाच्या रूपरेषेसाठी बोर्डाची पहिली बैठक या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.