नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने सणासुदीच्या हंगामात प्रवाशांना मोठी भेट जाहीर करताना, आधी प्रवास करून नंतर भाडे अदा करण्याची सुविधा दिली आहे. विशेष म्हणजे भाडे एकरकमी देण्याचीही गरज नाही. सुलभ हप्त्यांत ते अदा करता येईल.
आयआरसीटीसीने दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवी सेवा सुरू केली आहे. या सेवेनुसार, प्रवासी आता सुलभ हप्त्याने (ईएमआय) तिकीट बुक करू शकतात. त्यासाठी आयआरसीटीसीने फिनटेक ‘कॅश’सोबत भागीदारी केली आहे. आधी प्रवास करून भाडे अदा करण्याची सोय यात आहे.
‘कॅश’च्या ‘ट्रॅव्हल नाऊ पे लॅटर’ (आधी प्रवास करा, नंतर भाडे भरा) योजनेनुसार, प्रवासी आपल्या तिकिटाचे पैसे ३ ते ६ महिन्यांच्या समान हप्त्यांत भरू शकतील. रेल कनेक्ट ॲपवर रेल्वे तिकिटांचे बुकिंग लाखो प्रवाशांसाठी सोपे आणि तणावमुक्त होईल.
फायदा नेमका कुणाला?‘कॅश’चा ‘ट्रॅव्हल नाऊ पे लॅटर’ ईएमआय पेमेंट पर्याय सर्व वापरकर्त्यांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय मिळेल. तत्काळ सेवेत तिकीट बुक करणाऱ्यांना आयआरसीटीच्या ट्रॅव्हल ॲपवर हा पर्याय उपलब्ध असेल. आयआरसीटीसी ॲपवरून रोज १५ लाखांपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेचे तिकीट बुक करतात.
प्रवाशांना त्रास होईल?‘कॅश’चे संस्थापक व्ही. रमणकुमार म्हणाले की, आयआरसीटीसी’सोबत ‘ट्रॅव्हल नाऊ पे लॅटर’ योजना जोडली जाणे हाच भारतातील एक सर्वांत मोठा प्रवास आहे. ही भागीदारी आयआरसीटीसीच्या लाखो ग्राहकांना ही सुविधा देईल. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.