Join us  

मित्रपक्षांच्या राज्यांसाठी खजिना खुला; बिहार, आंध्र प्रदेश यांच्या पदरात भरभरून दान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 6:14 AM

पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या  असलेल्या ओडिशा राज्यासाठीही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सत्तेतील त्यांच्या सहकारी पक्षांची मर्जी राखण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी आपला खजिना खुला करून दिला. केंद्रातील सत्तेत भाजपचे भागीदार असलेल्या तेलुगू देसम पक्षाने विभाजनानंतर आंध्रच्या विकासासाठी केंद्राकडून भरीव निधीची मागणी केली होती. 

 पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या  असलेल्या ओडिशा राज्यासाठीही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. ओडिशा हे तीर्थक्षेत्र, निसर्ग सौंदर्य, वनसंपदा, देखणे समुद्रकिनारे आणि कौशल्यवान कारागिरांनी समृद्ध असल्याचा उल्लेख अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात केला. 

राजधानी विकासासाठी आंध्रला १५ हजार कोटीआंध्र प्रदेशला राजधानी अमरावतीच्या विकासासाठी आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यानुसार तब्बल १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पुढील काळातही आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.पोलावरम सिंचन प्रकल्पाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, विशाखापट्टणम - चेन्नई इंडस्ट्रीयल कॉरिडोर आणि हैदराबाद-बंगळुरू इंडस्ट्रीयल कॉरिडोर यांच्यासह रायलसीमा, प्रकाशम आणि आंध्रच्या  उत्तरेकडील तटवर्ती मागास भागालासुद्धा भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

बिहारसाठी तब्बल ५८ हजार ९०० कोटींची तरतूद  बिहारसाठी तब्बल ५८ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. पीरपेंटी येथे नवीन २४०० मेगावॅट ऊर्जेच्या प्रकल्पासाठी २१ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला नसला तरी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांना अर्थसंकल्पातून खूश करण्याचा प्रयत्न केंद्र शासनाकडून झाल्याची चर्चा आहे. नवीन विमानतळासह बिहारमध्ये रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासाठी राज्याला २६ हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे. पूर नियंत्रणासाठी विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे. गया इथल्या मंदिरांचा विकास केला जाणार आहे. 

आंध्रच्या गरजा ओळखून पावले उचलल्याबद्दल केंद्र सरकारचा आभारी आहे. आंध्रची पुनर्उभारणी करण्यास केंद्राचे सहकार्य मोलाचे आहे. - चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश

विशेष मदतीमुळे राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे विशेष दर्जा मिळाला नसला, तरी दुसऱ्या स्वरूपात विशेष मदत मिळाली आहे.  - नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार

टॅग्स :अर्थसंकल्प 2024बिहारभाजपा