Join us

आयटी क्षेत्रात जबरदस्त बूम; 100 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ, ६० लाखांपर्यंतचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 7:03 AM

IT sector : सूत्रांनी सांगितले की, भारतातून स्वस्त मनुष्यबळ भरण्याची सवय असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या नव्या बदलामुळे हैराण झाल्या असून, त्यांना कर्मचारी भरतीवरील तरतुदीत मोठी वाढ करावी लागत आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९च्या साथीमुळे बहुतांश क्षेत्रात वेतनकपात व नोकरकपातीचे संकट कोसळलेले असताना सॉफ्टवेअर उद्योगात अद्भुत वृद्धी आली आहे. भारतातील आयटी व्यावसायिकांच्या वेतनात इतक्या झपाट्याने वाढ होत आहे की, भारतीय कर्मचाऱ्यांची भरती करणे बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही आता अवघड होत आहे. 

सूत्रांनी सांगितले की, भारतातून स्वस्त मनुष्यबळ भरण्याची सवय असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या नव्या बदलामुळे हैराण झाल्या असून, त्यांना कर्मचारी भरतीवरील तरतुदीत मोठी वाढ करावी लागत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना मनुष्यबळ भरतीसाठी मदत करणारी संस्था अँटल इंडियाचे व्यवस्थापकीय भागीदार विनू नायर यांनी सांगितले की, काही प्रकरणांत १० वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ५० ते ६० लाख रुपयांचे पॅकेज द्यावे लागत आहे.

या वेतनवाढीमुळे ऑफशोअरिंगच्या दृष्टिकोनातून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतातील ग्लोबल इन-हाऊस सेंटर्स (जीआयसी) स्पर्धात्मकतेच्या बाबतीत अव्यवहार्य ठरत आहेत. टॅलेंट ५०० चे सहसंस्थापक विक्रम अहुजा यांनी सांगितले की, सर्वोच्च गुणवत्ताधारकांना आकर्षित करण्यासाठी आयटी कंपन्या ५० टक्के ते १०० टक्के वेतनवाढ देऊ करीत आहेत. अचानक झालेल्या या वेतनवाढीमुळे जागतिक कंपन्यांसाठी भारताचे आकर्षण कमी होत आहे. कारण स्वस्त मनुष्यबळ मिळते, म्हणून या कंपन्या भारतात आलेल्या आहेत. 

कोविड-१९ साथीमुळे जगभरातील व्यवसाय व उद्योग स्वत:ला अद्यायावत करीत आहेत. त्यामुळे डीजीटीकरणास मोठी चालना मिळाली आहे. याचा फायदा आयटी क्षेत्रातील कंपन्यांना झाला आहे. डीजीटीकरण करण्यासाठी आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डस् मिळत असून, त्या पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना मनुष्यबळाची गरज आहे. गेल्या काही महिन्यांत सर्वच आघाडीच्या आयटी कंपन्यांनी नोकरभरती मोहीम राबविली आहे. त्यामुळे आयटी व्यावसायिकांना सोन्याचे दिवस आले आहेत.

भारतावरील अवलंबित्व कमी करताहेत जागतिक कंपन्या

- विक्रम अहुजा यांनी सांगितले की, खरे म्हणजे जागतिक भरतीकर्त्यांसाठी भारत अजूनही प्राधान्यक्रमांवर वरच्या स्थानी आहे. तथापि, वेतनातील बूममुळे अनेक कंपन्या आता भारतावरील अवलंबित्वाचा फेरविचार करीत आहेत. - भारत आणि इतर देशांतील ‘टॅलेंट पूल’मध्ये समतोल साधण्याची प्रक्रिया कंपन्यांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे. पोलंड, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि युक्रेन हे देश झपाट्याने पर्याय म्हणून महत्त्वाचे ठरत आहेत.

टॅग्स :माहिती तंत्रज्ञानव्यवसायनोकरी