हल्ली प्रत्येकाला गुंतवणूक करायची असते, पण असुरक्षित गुंतवणुकीच्या भीतीनं गुंतवणूकदार आपला पैसा कुठेही गुंतवायला घाबरतात. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणुकीबरोबरच चांगला परतावा मिळवण्यासाठी आपण आपले पैसे कोणत्या योजनेत गुंतवावेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरं तर, सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला तर एफडी सर्वात सुरक्षित मानल्या जातात. कारण बँका एफडींवर ठरलेला व्याज दर देतात.
अशावेळी ठरलेल्या वेळेत किती परतावा मिळेल, हे लोकांना आधीच माहित असतं. बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्रनं नुकतीच तीन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी दोन विशेष एफडी योजना सुरू केल्या आहेत.
१५ जुलैपासून सुरुवात
बँक ऑफ बडोदानं अधिक व्याजदरासह नवीन विशेष एफडी योजना सुरू केली आहे, ज्याला बॉब मॉन्सून धमाका फिक्स्ड स्कीम असं नाव देण्यात आलं आहे. बँकेने एफडीच्या व्याजदरातही बदल केला आहे. ही स्कीम दोन टर्ममध्ये उपलब्ध आहे, एक ३९९ दिवसांसाठी, तर दुसरी योजना ३३३ दिवसांसाठी आहे. या दोन्ही एफडी योजनांवर मिळणारा व्याजदर अनुक्रमे ७.२५ टक्के आणि ७.१५ टक्के आहे. या स्कीम्स १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.
सीनिअर सीटिझन्सना अधिक व्याज
ज्येष्ठ नागरिकांना ३९९ दिवसांसाठी वार्षिक ७.७५% आणि ३३३ दिवसांसाठी वार्षिक ७.६५% म्हणजेच वार्षिक ०.५०% अतिरिक्त व्याज दिलं जाईल. याशिवाय, नॉन कॉलेबल डिपॉझिटवर (१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि ३ कोटी रुपयांपेक्षा कमी किमान ठेवींवर लागू) अतिरिक्त ०.१५% व्याज मिळेल. बँक सामान्य नागरिकांसाठी ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या कॉलेबल डिपॉझिटवर ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडीवर ४.२५% ते ७.२५% व्याज देते.