मुंबई - थोड्याशा वाढीनंतर मंगळवारी बाजार पुन्हा कोसळला. सेन्सेक्स १,३९० अंकांनी घसरून ७६,०२४ वर बंद झाला, तर निफ्टी ३५३ अंकांनी घसरून २३,१६५ वर स्थिरावला. बाजारात मंगळवारी चौफेर विक्रीचे चित्र होते. अमेरिकेकडून २ एप्रिलपासून लादण्यात येणाऱ्या कराच्या पार्श्वभूमीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यात आयटी तसेच खासगी बँकांच्या शेअर्सच्या जोरदार विक्रीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ३.४९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
दोन्ही प्रमुख निर्देशांकांत एका महिन्यात एका दिवसात सर्वात मोठी घसरण झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंग वधारले.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
एचसीएल टेक शेअर सर्वाधिक ३.८७ टक्क्यांनी घसरला. बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस च्याशेअर्समध्ये २.७३ ते ३.४६ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली.
मंगळवारी एकूण ४,१९५ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यापैकी २,७०९ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १,३४१ शेअर्समध्ये घसरण झाली. १४५ शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय बंद झाले. ७६ शेअर्सनी नवा ५२-आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर १९६ शेअर्सनी ५२-आठवड्यांचा नवा नीचांकी स्तर गाठला.
घसरण नेमकी कशामुळे?
अमेरिकेने केलेली घोषणा : अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या शुल्कामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा स्वीकारलेला आहे. ट्रम्प प्रसासनाकडून भारतासह अनेक देशांवर शुल्क वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.
आयटी शेअर्सवर दबाव : अमेरिकेतील बाजारावर भिस्त असलेल्या आयटी कंपन्यांचे शेअर्स १.८% ने घसरले. टॅरिफवाढीने आर्थिक मंदीची चिन्हे आहेत. अशात मागणीत घट होण्याची चिंता आहे. मार्च तिमाहीत या क्षेत्राने आधीच १५% ची घसरण नोंदवली आहे.
तेलाच्या किमतीत उसळी : कच्च्या तेलाच्या किमती पाच आठवड्यांच्या उच्चांकाजवळ आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईची चिंता वाढली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे ७४.६७ डॉलर होता. तर यू.एस. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ७१.३७ डॉलरवर व्यापार करत होता.
जोरदार नफावसुली : गेल्या आठ सत्रांमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स सुमारे ५.४% वाढले ज्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला. नुकत्याच झालेल्या तेजीनंतर गुंतवणूकदार नफा बुक करत आहेत, त्यामुळे बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.