मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पदभार स्वीकारताच कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. यामुळे भारतातील गुंतवणूकदार कमालीचे सतर्क झाले असून मंगळवारी सेन्सेक्स १२३५ अंकांनी कोसळला. बाजाराचा हा मागील सात महिन्यांचा नीचांक आहे. आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आदी बड्या कंपन्यांच्या विक्रीमुळे बाजारात घसरणीचे चित्र दिसले.
या घसरणीमुळे सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात ७.५५ लाख कोटींची घट होऊन ते ४२५.३५ लाख कोटींवर पोहोचले आहे. एका दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती साडेसात लाख कोटींहून अधिक घटली आहे. सेन्सेक्स १२३५ अंकांनी घसरून ७५,८३८ अंकांवर बंद झाला तर निफ्टी ३२० अंकांनी घसरून २३,०२४ अंकांवर स्थिरावला.
अनिश्चिततेचे सावटझोमॅटोमध्ये सर्वाधिक ११% घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, आणि एसबीआयच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. क्षेत्रीय निर्देशांकात ऑटो, एफएमसीजी, आयटी, मेटल, फार्मा, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅसमध्ये ०.४% ते १% वाढ नोंदली गेली. आर्थिक अनिश्चितता, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि नफ्याच्या मर्यादित वाढीमुळे शेअर बाजारावर दबाव आहे.
२,७८८ शेअर्स घसरलेमंगळवारी दिवसभरात ४,०८८ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यातील १,१८७ शेअर्स वाढीसह बंद झाले तर २,७८८ शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. ११३ शेअर्समध्ये मंगळवारी कोणताही बदल दिसून आला नाही. १०३ कंपन्यांच्या शेअर्सने मंगळवारी ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला तर ६७ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर गाठला.
बाजार कशामुळे घसरला? टॅरिफ वाढीची भीती : अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवर २५% टॅरिफ लागू करण्याचा विचार सुरू केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेची भावना आहे. बड्या कंपन्यांचे शेअर्स घसरले : झोमॅटोच्या तिमाही नफ्यात ५७% घट झाल्याने शेअरमध्ये ११% घसरला. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय यांच्या शेअर्समुळेही घसरण आणखी वाढली.कंपन्यांना मर्यादित नफा : ब्लूमबर्गच्या अहवालानुसार निफ्टी ५० कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्यामध्ये फक्त ३% वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे संकेत नकारात्मक आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रांत घसरण : टिकाऊ वस्तू निर्देशांकात ३.२% घसरण झाली. डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये १३% घसरला. रिअल इस्टेट निर्देशांकात ३% घसरल्याचे दिसून आले. पैसे काढण्याचे सत्र : २० जानेवारी २०२५ पर्यंत विदेशी गुंतवणूदकार संस्थांनी ४८,०२३ कोटींची विक्री केली आहे. या विक्रीचा प्रचंड दबाव आल्याने बाजार घसरला.