नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी असलेल्या अणुकरारातून बाहेर पडल्याचे घोषणा केल्याचा फटका भारताला बसणार असून, इंधनाचे दर भडकणार आहेत.इराणवर अमेरिका निर्बंध लादणार असल्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढतील. त्यामुळे भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा तेल पुरवठादार देश असलेल्या इराणकडून आणि इतर देशांकडूनही तेल घेणे महाग होणार आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव भडकलेले असतानाच या नव्या दरवाढीने या महागाईत आणखी तेल ओतले जाईल. याचा फटका सर्वसामान्यांना बसेल.इराणचे छाबहार बंदर विकसित करण्यास भारताने ५0 कोटी डॉलरचा करार केला आहे. पश्चिम आशियासोबतच्या व्यापारासाठी या बंदरामुळे पाकिस्तानी भूमीतून जाण्याची गरज राहणार नाही. हे काम सुरू ठेवल्यास अमेरिका नाराज होऊ शकते. इराणमार्गे रशियापर्यंत मालवाहतूक केल्याने ३० टक्के वेळ वाचतो. मात्र, या कॉरिडोरवरही परिणाम होऊ शकतो. शांघाय सहकार्य संघटनेत इराणला सहभागी करून घेतल्यास अमेरिकाविरोधात गट निर्माण झाल्यासारखे होईल. त्यामुळे यापुढे भारताला सावध पावले टाकावी लागतील.
ट्रम्प यांच्या ‘इराण’नीतीने भारतात इंधन भडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 5:46 AM