Join us

महागाईतही विश्वास सोन्यावरच; गोल्ड ईटीएफमध्ये १ महिन्यात १,०२८ कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 9:56 AM

जुलै २०२३ मध्ये ४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. एप्रिल-जून तिमाहीत गोल्ड ईटीएफमध्ये २९८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

नवी दिल्ली : अमेरिकेतील व्याजदरांत सातत्याने वाढ होत असल्यामुळे ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडा’त (ईटीएफ) ऑगस्ट २०२३ मध्ये १,०२८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हा १६ महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. याआधी एप्रिल २०२२ मध्ये सर्वाधिक १,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये झाली होती. 

जुलै २०२३ मध्ये ४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. एप्रिल-जून तिमाहीत गोल्ड ईटीएफमध्ये २९८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्याआधीच्या ३ तिमाहीत गुंतवणूकदारांनी पैसे काढले होते. मार्चच्या तिमाहीत १,२४३ कोटी, डिसेंबरच्या तिमाहीत ३२० कोटी आणि सप्टेंबरच्या तिमाहीत १६५ कोटी रुपये गुंतवणूकदारांनी या गुंतवणुकीतून  काढून घेतले होते.

काय आहे गोल्ड ईटीएफ?हे सोन्याच्या किमतीवर आधारित असते. यात ईटीएफ कंपन्या सोन्यात गुंतवणूक करतात. हे प्रत्यक्ष सोन्याचे प्रतिनिधित्व करणारे युनिट आहे. त्याचे स्वरूप कागदी अथवा डिमॅट असे असते. गोल्ड ईटीएफचे एक युनिट १ ग्रॅम सोन्याच्या बरोबरीत असते. 

युद्धानंतर सर्वाधिक प्रमाणगोल्ड ईटीएफमध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर सर्वाधिक मासिक गुंतवणूक ऑगस्ट २०२३ मध्ये झाली. व्यवस्थापनाधीन संपत्ती ४ टक्के वाढून २४,३१८ कोटी रुपये झाली. आदल्या महिन्यात ती २३,३३० कोटी होती.

ईटीएफ खाती ४७.९५ लाखांवरगोल्ड ईटीएफमधील खात्यांची संख्या ऑगस्टमध्ये २०,५०० ने वाढून ४७.९५ लाख झाली. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांचे एकूण गुंतवणूक मूल्य (एयूएम) ४ टक्के वाढून २४,३१८ कोटी रुपये झाले. 

का होते सोन्यात गुंतवणूक?जगात अजूनही महागाई अंदाजापेक्षा अधिक आहे. वृद्धीदर धीमा झालेला आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित वाटत आहे. त्यामुळे ईटीएफलाही फायदा मिळत आहे.  

टॅग्स :सोनंगुंतवणूक