Stock Market Crash : इस्रायलच्या हेझबोलाविरोधी कारवाईस प्रत्युत्तर म्हणून इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर १८० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यानंतर दोन्ही देशात युद्धाची ठिणगी पडली आहे. या संघर्षाचा परिणाम आता जगभरात पाहायला मिळत आहे. बुधवारी भारतीय शेअर बाजारात १२०० अंकांनी घसरला होता. आज पुन्हा एकदा तोच ट्रेंड पाहायला मिळत आहे. युद्धाचं सावट आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारातील घसरण वाढली आहे. सेन्सेक्स आज १८०० तर निफ्टी ५५० हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. बँकिंग, एफएमसीजी, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये वेगाने झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली आहे.
निफ्टी बँक ११७० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण आहे. सेन्सेक्स सध्या १८०० अंकांच्या घसरणीसह ८२,४६६ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५५८ अंकांच्या घसरणीसह २५,२४० अंकांवर व्यवहार करत आहे.
L&T च्या शेअर्समध्ये मोठी घसरणसेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २ शेअर्स वाढीसह तर २८ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या ५० स्टॉक्सपैकी फक्त ४ शेअर्स वाढत आहेत तर ४६ शेअर्स घसरत आहेत. वाढत्या शेअर्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील १.७६ टक्के, टाटा स्टील ०.३० टक्के, ओएनजीसी ०.१९ टक्के, डॉ रेड्डी ०.०३ टक्के तेजीसह व्यवहार करत आहे. घसरणाऱ्या शेअर्समध्ये एल अॅण्ड टी ४१.४ टक्के, मारुतु सुझुकी ४.०५ टक्के, एशियन पेंट्स ४.०४ टक्के, रिलायन्स ३.७५ टक्के, ॲक्सिस बँक ३.७० टक्के, बजाज फिनसर्व्ह ३.७० टक्के, बजाज फायनान्स ३.६७ टक्के घसरला आहे.
गुंतवणूकदारांचे 10.58 लाख कोटी रुपयांचे नुकसानबाजारातील घसरणीच्या त्सुनामीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप १०.५८ लाख कोटी रुपयांनी घसरून ३६४.२८ लाख कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या सत्रात ३७४.८६ लाख कोटी रुपये होते.
शेअर बाजार का पडला? इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम जगभरातील शेअर्सवर दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारही त्याच्या प्रभावापासून दूर राहिला नाही. मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. तणावामुळे ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या जवळ पोहोचली, ज्यामुळे भारतीय बाजार घसरला.