Join us

शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स-निफ्टी आपटले; हिंदाल्कोमध्ये तेजी, बीपीसीएल घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 9:39 AM

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 591 अंकांनी घसरला आणि 73636 अंकांच्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: शेअर बाजाराचं कामकाज सोमवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 591 अंकांनी घसरला आणि 73636 अंकांच्या पातळीवर उघडला. तर निफ्टी 170 अंकांनी घसरून 22348 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये कामकाज करत होते. 

सोमवारी सुरुवातीच्या कामकाजादरम्यान हिंदाल्को, ओएनजीसी, नेस्ले इंडिया आणि टीसीएस या कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. तसंच बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, अदानी एंटरप्रायझेस, एनटीपीसी आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. 

प्री ओपनिंगमध्येही घसरण 

सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात घसरणीसह होण्याची शक्यता होती. प्री-ओपन मार्केटमध्ये, बीएसई सेन्सेक्स 929 अंकांनी घसरला होता आणि 73315 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 180 अंकांनी घसरला होता आणि 22339 अंकांच्या पातळीवर काम करत होता. गिफ्ट निफ्टी वरून शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू होऊ शकतं असे संकेत मिळत होते. 

आशियाई बाजारात घसरण 

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. शुक्रवारी सुमारे एक टक्क्यांची घसरण झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी फायनान्स आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. कंपन्यांचे तिमाही निकाल बाजारात काही जीव आणू शकतात, असं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी तसंच इस्रायल आणि इराणमधील ताज्या वादामुळे शेअर बाजाराच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

मल्टिबॅगर शेअर्सची स्थिती 

मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर सोमवारच्या सुरुवातीच्या व्यवसायात इरेडा, स्पाईस जेट, गल्फ ऑईल, जेनसोल इंजिनिअरिंग, सर्व्होटेक पॉवर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. सोमवारी गौतम अदानी समूहाच्या सर्व 10 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

टॅग्स :शेअर बाजार