Join us

Ilker Ayci Air India: तुर्कस्तानी इल्केर आइची एअर इंडियाचे नवे प्रमुख; जाणून घ्या टाटाने त्यांनाच का निवडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 7:57 PM

Air India MD, CEO Ilker Ayci: टाटाने २० दिवसांत एअर इंडियाचा प्रमुख बदलला; तुर्कस्तानी व्यक्तीला निवडले, जाणून घ्या कोण आहेत ते

टाटा ग्रुपने एअर इंडिया ताब्यात घेतली आणि गेल्या २० दिवसांत एकापेक्षा एक बदल करण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी एडवायझरी जारी केली त्याला एक दिवस उलटत नाही तोच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया चालविण्यासाठी नव्या एमडी आणि सीईओची नियुक्ती केली आहे. महत्वाचे म्हणजे हा सीईओ भारतीय नाहीय तर तुर्कीश आहे. 

Turkish Airlines चे माजी अध्यक्ष इल्केर आइची (Ilker Ayci) यांना एअर इंडियाचा नवीन एमडी आणि सीईओ नियुक्त केले आहे. टाटा सन्सने ही नियुक्ती केली आहे. सोमवारी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे देखील या बैठकीला खास निमंत्रक म्हणून उपस्थित होते. कंपनीने आइची यांच्या नावाची घोषणा केलेली असली तरी या नियुक्तीला रेग्युलेटरी मंजुरी मिळणे बाकी आहे. 

आइची हे तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये १९७१ मध्ये जन्मलेले आहेत. त्यांनी Bilkent University मधून डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल एडमिनिस्ट्रेशनमधून पदवी घेतलेली आहे. 1997मध्ये त्यांनी Marmara University विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर केले आहे. 

का केली निवड...चंद्रशेखरन यांनी सांगितले की, इल्केर हे एव्हिएशन इंडस्ट्रीचे लीडर आहेत. त्यांनी त्यांच्या हुशारीने Turkish Airlines ला यश मिळवून दिले. Tata Group मध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो, ते एअर इंडियाला एका वेगळ्या युगात नेऊन ठेवतील. तर आयइची यांनी एअर इंडियाला 'आयकॉनिक एअरलाइन' म्हटले आहे.टाटाने परदेशी व्यक्तीला कंपन्यांच्या प्रमुखपदी नियुक्ती करणे ही काही पहिलीच वेळ नाही. या आधी टाटा मोटर्समध्ये जर्मन बिझनेसमन गुंटेर बुटस्चेक यांना सीईओ पद दिले आहे. त्यांच्या नेतृत्वातच टाटा मोटर्सने तळच्या स्थानापासून दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. असाच अविष्कार एअर इंडियाच्या बाबतीतही पहायला मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :एअर इंडियाटाटा