पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात कारण ते अधिक सुरक्षित मानलं जातं. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ही सर्वात लोकप्रिय पोस्ट ऑफिस बचत योजनांपैकी एक आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर विभागाच्या कलम 80C अंतर्गत कर लाभाची हमी मिळते. फायनॅन्शियस प्लॅनर्स अनेकदा गुंतवणूकदारांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये (National Saving Certificate) गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. कारण यामधून निश्चित परतावा होत असतो, शिवाय भांडवलाचंही संरक्षण होतं.
कोणाला होतो NSC चा फायदा?
तज्ञांनी दिलेल्ल्या माहितीनुसार, नियमित मासिक उत्पन्न मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक NSC चा वापर करू शकतात. कोणतीही व्यक्ती या योजनेत स्वतःच्या नावाने किंवा अल्पवयीन मुलांच्या वतीने गुंतवणूक करू शकते. NSC देखील दोन लोक एकत्रितपणे खरेदी करू शकतात.
पाच वर्षांनी तुमची गुंतवणूक 13.89 लाख रुपये
चालू तिमाहीत सरकार नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर 6.8 टक्के दरानं व्याज देत आहे. वरील व्याजदराच्या आधारे, तुम्ही आज NSC मध्ये 1000 रुपयांची गुंतवणूक केल्यास, पाच वर्षांनी तुमची गुंतवणूक 1389 रुपयांपर्यंत वाढेल. NSC मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नसल्यामुळे, कोणीही कितीही रकमेसाठी NSC खरेदी करू शकतो. तर, आज तुम्ही एनएससीमध्ये 10 लाख रुपये गुंतवल्यास, पाच वर्षांनी तुमची गुंतवणूक 13.89 लाख रुपये होईल.
प्रत्येक आर्थिक वर्षात NSC मध्ये 1.5 लाखापर्यंत गुंतवलेली रक्कम कलम 80C अंतर्गत आयकर कपातीसाठी पात्र आहे. NSC वर मिळणारं व्याज दरवर्षी जमा केलं जातं आणि मुदतपूर्तीवेळी दिलं जातं, व्याजाची रक्कम दरवर्षी पुन्हा गुंतवली जाते आणि प्रत्येक वर्षी कर कपातीसाठी पात्र असते, जास्तीक जास्त 1.5 लाखांपर्यत असते. तथापि, मुदतपूर्तीवर NSC वर मिळविलेलं संपूर्ण व्याज करपात्र होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.