Lokmat Money > बिझनेस न्यूज > टीव्ही, एसी महाग तर स्मार्टफोन स्वस्त

टीव्ही, एसी महाग तर स्मार्टफोन स्वस्त

१ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर शीतपेये, टीव्ही, एसी, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर महाग होतील. तर, स्मार्टफोन, छोट्या

By admin | Published: May 30, 2017 12:42 AM2017-05-30T00:42:45+5:302017-05-30T00:42:45+5:30

१ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर शीतपेये, टीव्ही, एसी, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर महाग होतील. तर, स्मार्टफोन, छोट्या

TV, AC expensive, smartphones cheap | टीव्ही, एसी महाग तर स्मार्टफोन स्वस्त

टीव्ही, एसी महाग तर स्मार्टफोन स्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर शीतपेये, टीव्ही, एसी, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर महाग होतील. तर, स्मार्टफोन, छोट्या कार आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तू स्वस्त होतील. स्मार्टफोनवर १३.५ टक्के कर आहे. तो १२ टक्के होईल.
साबण व टूथपेस्टवरील कराचे दर जीएसटीत २५-२६ टक्क्यांहून १८ टक्क्यांवर येतील. फळे, भाजीपाला, ब्रेड, दूध, डाळी यांना कर नसेल. इकॉनॉमी क्लासचा हवाई प्रवास काहीसा स्वस्त होईल. टॅक्सी आणि इतर प्रवासही काहीसा स्वस्त होईल. कारण, सध्याच्या ६ टक्के सेवा कराऐवजी जीएसटीत हा कर ५ टक्के झाला आहे. अन्नधान्यांवर कर नसेल.
जीएसटी परिषदेने १२०० वस्तू आणि ५०० सेवा यांचे कर जाहीर केले आहेत. ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांचे चार टप्पे यात केले आहेत.
पॅक सिमेंटचे दर कमी होतील. यावरील कर ३१ टक्क्यांहून २८ टक्के होईल. आयुर्वेदिकसह इतर औषधांचे कर १२ टक्के होतील. पूजेचे साहित्य, हवनमध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू, टिकली आणि गंध यांना करमुक्त करण्यात आले आहे. मनोरंजन, केबल आणि डीटीएच सेवांचे कर कमी होतील. राज्यांकडून लावला जाणारा मनोरंजन कर जीएसटीत समाविष्ट होईल. यावरील कर आता १८ टक्के होईल. या सेवांवर राज्यांमध्ये १० ते ३० टक्के मनोरंजन कर लागतो. याशिवाय १५ टक्के सेवाकरही लागतो.


फाइव्ह स्टार महाग

जीएसटीत फाइव्ह स्टार हॉटेलमधील कर वाढेल. तर, नॉन एसी रेस्टॉरंटमधील कर कमी होईल. सध्या नॉन एसी रेस्टॉरंटमध्ये १२.५ ते २० टक्के कर लागतो. एसी रेस्टॉरंटमध्ये राज्य व्हॅटशिवाय ६ टक्के कर लागतो. जीएसटीत नॉन एसी आणि मद्याचा परवाना नसलेल्या रेस्टॉरंटमध्ये १२ टक्के कर लागेल. तर, एसी अणि मद्याचे लायसन्स असलेल्या रेस्टॉरंटमध्ये १८ टक्के कर लागेल. फाइव्ह स्टार आणि त्यापेक्षा अधिकच्या रेस्टॉरंटवर २८ टक्के कर लागेल.

रिअल इस्टेट क्षेत्राला जीएसटी कराच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. पण, बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतींसाठी १२ टक्क्यांनी कर लागणार आहे. सध्या यावर १५ टक्के कर आहे.

मोटारसायकलही काही प्रमाणात स्वस्त होऊ शकतात. यावरील कर एक टक्क्यांनी कमी होऊन तो २८ टक्के होऊ शकतो. इलेक्ट्रीक दुचाकी आणि तिचाकींवरील कर १४ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर येईल. सौरपॅनलच्या कराच्या दरात १८ टक्के एवढी वाढ होईल. यावर सध्या शून्य ते ५ टक्के कर आहे.

अन्नपदार्थ, मिठाई आणि आइसक्रीम यांच्यावरील कर २२ टक्क्यांवरुन
१८ टक्के करण्यात आला आहे. तर, शाम्पू, परफ्यूम आणि मेकअपच्या वस्तू यांचा कर सध्याच्या २२ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला आहे.

Web Title: TV, AC expensive, smartphones cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.