TV Channel Price Hike: टीव्ही पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे, कारण लवकरच टीव्ही पाहणं महागात पडू शकते. डिस्ने स्टार, वायकॉम १८, झी एन्टरटेनमेंट आणि सोनी पिक्चर नेटवर्क इंडिया ब्रॉडकास्टर आपल्या चॅनेल्सचे दर वाढवू शकतात. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर टीव्ही पाहणं महागात पडू शकतं, असं मानलं जात आहे.
रिपोर्टनुसार, टीव्ही सब्सक्रिप्शन रेट ५ ते ८ टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजेच जर तुमचं मासिक टीव्ही सब्सक्रिप्शन ५०० रुपये असेल तर टीव्ही सब्सक्रिप्शन रेट जवळपास ४० रुपयांनी वाढू शकतो. मासिक टीव्ही सब्सक्रिप्शन रेट १००० रुपये असेल तर त्यात जवळपास ८० रुपयांची वाढ होईल.
ट्रायच्या सूचना
ईटीच्या वृत्तानुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (TRAI ब्रॉडकास्टर्सना सार्वत्रिक निवडणुका संपेपर्यंत नवीन दरानुसार करारावर स्वाक्षरी न केलेल्या डिस्ट्रीब्युटर प्लॅटफॉर्म ऑपरेटरचे (डीपीओ) सिग्नल बंद न करण्यास सांगितलं होतं.
बुकेंच्या दरात वाढ
जानेवारी महिन्यात आघाडीच्या ब्रॉडकास्टर्सनं आपल्या बेस बुके दरात सुमारे १० टक्क्यांनी वाढ केली होती. रिपोर्टनुसार, वायकॉम १८ मध्ये सर्वाधिक सुमारे २५ टक्के वाढ दिसून येईल. म्हणजेच सुमारे ५०० रुपयांच्या मासिक सब्सक्रिप्शनमध्ये सुमारे १२५ रुपयांची वाढ होणार आहे.
लवकर वाढू शकतात किंमती?
या रिपोर्टनुसार, क्रिकेट आणि मनोरंजन वाहिन्यांच्या बाजारपेठेतील वाट्यात सुमारे २५ टक्क्यांची सर्वाधिक वाढ नोंदवली जाऊ शकते. ही नवी किंमत फेब्रुवारीपासून लागू होणार होती. अशा परिस्थितीत जूनमध्ये मतदान संपल्यानंतर ब्रॉडकास्टर्स डीपीओवर दरवाढ करण्यासाठी दबाव आणतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एअरटेल डिजिटल टीव्हीसारख्या काही डीपीओंनी आधीच किंमतींमध्ये किरकोळ वाढ केली आहे.