Join us

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तयार करणाऱ्या बड्या कंपनीत सणासुदीपूर्वी कर्मचारी कपात, २०० जणांना काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 3:11 PM

Samsung India Layoff : सणासुदीपूर्वीच मोबाइल, टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशिन बनवणाऱ्या दिग्गज कंपनीनं आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची  माहिती समोर आली आहे.

Samsung India Layoff : सणासुदीपूर्वीच मोबाइल, टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशिन बनवणाऱ्या दिग्गज कंपनीनं आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची  माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समधून जवळपास २०० जणांना नारळ देण्यात येणार आहे. कंपनी भारतातील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कंपनीची व्यवसायातील वाढ मंदावली आहे. मागणी कमी झाल्यानं कंपनीच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच कंपनीनं कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. या क्षेत्रातील चार ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

मोबाइल फोन, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस आणि संबंधित व्यवसायांमध्ये ही कपात केली जाईल, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. एकूण व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९ ते १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात होईल, असा अंदाज आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे, त्यांना त्यांच्या करारानुसार तीन महिन्यांचं वेतन आणि सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी एक महिन्याचं वेतन देण्यात येणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

चेन्नईत सॅमसंगचा संप

सणासुदीपूर्वीच चेन्नई येथील प्रकल्पातील कामगारांनी बुधवारी तिसऱ्या दिवशीही बेमुदत संप पुकारल्यानं टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अजूनही क्षमतेच्या ५० ते ८० टक्के उत्पादनासह हा प्रकल्प चालविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

टॅग्स :सॅमसंगनोकरी