नवी दिल्ली - दूरचित्र संचामध्ये (टीव्ही) वापरण्यात येणाऱ्या ओपन सेलच्या किमती कोरोना साथीपासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे टीव्हीच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. आता टीव्हीच्या किमतींत पुन्हा एकदा १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
डिसेंबरपासून ओपन सेलच्या किमती २० टक्के वाढल्याने फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत टीव्हीच्या किमती १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची तयारी कंपन्यांनी चालविली आहे. उत्पादनात कपातीचाही कंपन्यांचा विचार आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा घटू शकतो.
टीव्ही विक्रेत्यांनी सांगितले की, छोट्या आणि मोठ्या पडद्याच्या टीव्हींच्या किमती वाढू शकतात. काही कंपन्या किमतीत एकरकमी वाढ न करता टप्प्याटप्प्याने थोडी थोडी वाढ करू शकतात. ‘सुपर प्लास्ट्रॉनिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीत सिंह म्हणाले की, फेब्रुवारी-मार्चमध्ये किमती १० टक्के वाढू शकतात.
उत्पादन खर्चात सेलचा वाटा ६० टक्के टीव्हीच्या एकूण उत्पादन खर्चात ओपन सेलचा वाटा ६० ते ६५ टक्के असतो. ओपन सेलचे सर्वाधिक उत्पादन चीनच्या ४ कंपन्या करतात. त्यामुळे त्याच्या किमतीही याच कंपन्या आपल्या मर्जीनुसार ठरवता. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ओपन सेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते.