Join us

मस्कला 'ट्विटर डील' पडलं महागात; कंपनीची व्हॅल्यू आली फक्त ३३ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 1:37 PM

फिडेलिटीच्या अहवालात समोर आली मोठी गोष्ट

Twitter Elon Musk: 7 महिन्यांपूर्वी एलॉन मस्कने ट्विटर $44 बिलियनमध्ये विकत घेतले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी जरा जास्त किंमत मोजावी लागल्याचे मत त्यावेळी मस्क यांनी व्यक्त केले होते. नवीन वर्ष सुरू झाले आणि ट्विटरचे मूल्य 50 टक्क्यांनी खाली आल्याचे वृत्त आले होते. आता मे महिन्यात समोर येणारी आकडेवारी अधिक धक्कादायक आहे. ट्विटरचे मूल्य 29 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमी झाले आहे, जो मोठा धक्का मानला जात आहे. याचा अर्थ 7 महिन्यांत कंपनीचे मूल्य केवळ 33 टक्के शिल्लक राहिले आहे.

ट्विटर विकत घेताना मस्कने $44 बिलियनमध्ये सौदा पक्का केला. ती रक्कम खरे पाहता मूळ किमतीपेक्षा जास्तच आहे असे मस्कने म्हटले होते. त्यात $33.5 बिलियन इक्विटीचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी इलॉन मस्क यांनी स्वतः असेही सांगितले होते, की त्यांनी ट्विटरसाठी जे पैसे मोजले आहेत ते त्याच्या मूल्याच्या निम्म्याहून कमी आहे. दरम्यान फिडेलिटीने सादर केलेला अहवाल कोणत्या आधारावर मूल्यांकन जाहीर करणारा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी इतर कोणत्या कंपनीकडून माहिती घेतली आहे का, याबाबतही सांगितले गेलेले नाही.

फिडेलिटीने प्रथम नोव्हेंबरमध्ये त्याच्या ट्विटर शेअर्सची किंमत खरेदी मूल्याच्या 44 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे सांगितले. यानंतर डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये अधिक मार्कडाऊन करण्यात आले. मस्क यांनी पदभार स्वीकारल्यापासून ट्विटर आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत आहे. 13 अब्ज डॉलर्सचे कर्ज पाहता मस्कने मस्कच्या कंटेंट मॉडरेशनसह असे काही निर्णय घेतले, ज्यामुळे ट्विटरचा महसूल 50 टक्क्यांनी कमी झाला. दुसरीकडे, ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन विकून तो महसूल वसूल करण्याचा प्रयत्नात आतापर्यंत अयशस्वी झाला आहे. मार्चच्या अखेरीस, ट्विटरच्या मासिक युजर्सपैकी 1 टक्क्यांहून कमी लोकांनी साइन अप केले होते. ट्विटरने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही पण काहींनी तसा दावा केला होता.

टेस्लाच्या शेअर्सने मस्कला तारलं!

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्कची ट्विटरमधील गुंतवणूक आता $8.8 अब्ज इतकी आहे. मस्कने कंपनीतील अंदाजे ७९ टक्के भागभांडवल मिळविण्यासाठी गेल्या वर्षी २५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला. निर्देशांकानुसार, सध्या इलॉन मस्कची एकूण संपत्ती $190 अब्ज आहे आणि आज त्यांची एकूण संपत्ती सुमारे $5 बिलियनने वाढली आहे. या वर्षी त्याच्या एकूण संपत्तीत $53 अब्जची वाढ झाली आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्याच्या एकूण संपत्तीत वाढ झाल्याचे स्पष्ट आहे.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटरव्यवसाय