उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. वेगवेगळ्या प्रतिभावंत तरुणाईला किंवा संशोधकांचं कौतुक करताना त्यांना मोठं गिफ्टही देतात. यापूर्वी त्यांनी अनेकांना महिंद्रा कारच देऊ केल्या आहेत. तर, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला भन्नाट उत्तर देणाऱ्या नेटीझन्सलाही बक्षीस देऊ केलं आहे. त्यामुळे, आनंद महिंद्रांची फॅन फॉलोविंगही मोठी आहे. सोशल मीडियातून चाहते अनेकदा त्यांना मेन्शन करुन काही मागण्याही करत असतात. आता, एका त्यांच्या चाहत्याने त्यांच्याकडे भन्नाट मागणी केलीय. त्यामुळे, महिंद्रा हेही अवाक् झाले आहेत.
आनंद महिंदांनी देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना महिंद्रा थार गाडी गिफ्ट देऊ केली आहे. तर, काही दिवसांपूर्वीच विश्व चॅम्पियन बुद्धीबळ स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या प्रज्ञानंदा यालाही त्याच्या आई-वडिलांसाठी कार गिफ्ट केली. त्यामुळे, महिंद्रा हे सोशल मीडियावरील अनेकांचं आवडतं आणि लोकप्रिय व्यक्तीमत्व आहे. अनेकदा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या प्रतिभा आणि कलाकृतीला ते दाद देतात. त्यातूनच, सामान्य माणूसही ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्याशी थेट जोडला आहे. आता, त्यापैकीच एका युजरने आनंद महिंद्रा यांच्याकडे रोख रकमेची मागणी केली. त्यामुळे, उद्योगपती महिंद्रा हेही अवाक् झाले.
R नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन महिंद्रा यांना मेन्शन करत १ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सर, मला महिंद्राचे शेअर खरेदी करण्यासाठी १ लाख रुपये पाहिजेत, असे ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे. त्यावर, आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिलंय. व्हॉट एन आयडिया सरजी... तुमच्या हिंमतीसाठी टाळ्या, असे महिंद्रा यांनी म्हटले. तसेच, पुछने के लिए क्या जाता है... असे म्हणत त्या युजर्संची मागणी मजेशीरपणे फेटाळूनही लावली.
चिमकुल्याच्या प्रश्नालाही दिलं उत्तर
दरम्यान, आनंद महिंद्रांनी २ दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये चिकू नावाचा मुलगा त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरील रीलमध्ये ७०० रुपयांत थार देण्याची मागणी करत आहे. या मुलाचा व्हिडीओ आनंद महिंद्रांना त्याच्या एका निकटवर्तीयाने पाठविला होता. यावर आनंद महिंद्रांनी या चिकुचे इन्स्टावरील अन्य व्हिडीओ देखील पाहिले आणि ते त्याच्या प्रेमातही पडले आहेत. परंतु, आनंद महिंद्रा चिकुला ७०० रुपयांत कार देणार का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. तर नेटकऱ्यांनीही आनंद महिंद्रांकडे चिकुचा हट्ट पूर्ण करण्याचा ठेका धरला आहे. त्यावर, महिंद्रा यांनी प्रतिक्रिया देत, असं केल्यास आमचं दिवाळं निघेल, असे म्हटलं होतं.