Gautam Adani: मागील आठवडा गौतम अदानींसाठी खूप चांगला राहिला. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये एवढी मोठी वाढ, पहिल्यांदाच पाहायला मिळाली. यामुळे अदानी ग्रुपचे मार्केट कॅप 14 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत दोन गुंतवणूकदारांनी अदानी ग्रुपकडून तब्बल 19500 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली आहे. हे गुंतवणूकदार दुसरे कोणी नसून GQG पार्टनर्स आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC आहेत. दोन्ही कंपन्यांची अदानीच्या 6 ते 7 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.
GQG ला किती फायदा झाला?
गेल्या आठवड्यात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या वाढीमुळे GQG ला मोठा फायदा झाला. अदानी समूहाच्या 6 कंपन्यांमध्ये GQG ची गुंतवणूक आहे. अदानी ग्रुपमुळे गेल्या आठवड्यात कंपनीच्या महसुलात 28 टक्के, म्हणजेच 7287 कोटी रुपयांची वाढ झाली. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 32,887 कोटी रुपये झाली आहे. विशेष म्हणजे, GQG ने मार्चच्या सुरुवातीला अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. ही गुंतवणूक सुमारे 15,446 कोटी रुपये होती. त्यांनी अदानी समूहाच्या सुमारे अर्धा डझन कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले होते.
LIC लाही मोठा नफा
दुसरीकडे, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीलाही मोठा नफा झाला आहे. एलआयसीने अदानी समूहाच्या 7 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या आठवड्यात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने एलआयसीला 12,234 कोटी रुपयांचा नफा झाला. अदानी समूहातील एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य 58,017 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे एलआयसीलाही मोठा तोटा झाला होता. पण, आता हा तोटा भरुन निघतोय.
mcap 14.30 लाख कोटींच्या पुढे
गेल्या आठवड्यात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 65 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्येही प्रचंड वाढ झाली. गेल्या आठवड्यात अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये 3.14 लाख कोटी रुपयांची वाढ झाली, त्यानंतर अदानी समूहाचे एकूण मार्केट कॅप 14.30 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.