नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आणलेल्या प्रधानमंत्री जन धन योजनेनंतर आता याच योजनेतील खातेधारकांसाठी नवीन विमा योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पातच करण्यात आली होती. येत्या जूनपासून या योजनांची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
सुरूवातीला विमा कंपन्यांचा सरकारी बँकांशी यासंदर्भात करार होणार असून दुसऱ्या टप्यात खासगी क्षेत्रातील बँकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन आॅफ इंडिया अर्थात एलआयसीने आयडीबीआय, देना बँक आणि कार्पोरेशन बँकेशी करार केला असून बचत खातेदारांसाठी प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना राबविण्यात येणार आहे.
इंडियन बँक असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सामाजिक सुरक्षितता योजनांवर चर्चा झाली. सर्व सदस्यांना यावेळी ज्या विमा कंपन्या योजनेत सहभागी होउ इच्छितात त्या कंपन्यांबरोबर करार करण्याबाबत सुचविण्यात आले. एलआयसी आणि अन्य सरकारी विमा कंपन्यांकडून उपलब्ध असणाऱ्या विमा योजनांप्रमाणेच या योजनांतील अटी असतील.
या योजनेतील प्रिमियम हा थेट बँक खात्यातून घेतला जाणार असल्याने आम्हाला बँकांशी करार करणे गरजेचे आहे. विमा योजना कशा पध्दतीने राबवायची याबाबत चर्चा सुरू आहे. सरकारी विमा कंपन्या तरी सरकारी बँकांशी जून अखेरीस करार करतील असे एका सरकारी विमा कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्पात कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठीदोन नवीन विमा योजना जाहीर केल्या होत्या. सुरक्षा विमा योजना ही अपघाती विमा योजना असून २ लाख रूपयांचे विमा संरक्षण या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे. यासाठी प्रतिवर्षी फक्त १२ रूपये प्रिमियम आकारण्यात येईल. विमा कंपन्यांनी हा प्रिमियम २४ रूपये ठेवण्याची मागणी केली होती. परंतु ही योजना आकर्षक करण्यासाठी तो १२ रूपयेच ठेवण्याचा निर्णय अर्थमंत्रालयाने घेतला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जनधन खातेदारांसाठी दोन नवीन विमा योजना
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आणलेल्या प्रधानमंत्री जन धन योजनेनंतर आता याच योजनेतील खातेधारकांसाठी नवीन विमा योजना लागू करण्यात येणार आहे.
By admin | Published: April 23, 2015 02:17 AM2015-04-23T02:17:48+5:302015-04-23T02:17:48+5:30