नवी दिल्ली- क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड आता गरजेचं झालं आहे. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना डेबिट अथवा क्रेडिट कार्ड आवश्यक असते. त्यासाठी बऱ्याचदा आपल्याला डेबिट आणि क्रेडिट ही दोन्ही कार्ड सोबत ठेवावी लागतात. परंतु आपल्याला आता दोन्ही कार्ड बरोबर घेऊन फिरण्याची गरज नाही. कारण एका सरकारी बँकेनं नव्या तंत्रज्ञानाचं कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून दिलं असून, त्यात आपल्याला क्रेडिट आणि डेबिट या दोन्ही सुविधा एकाच कार्डमध्ये मिळतात. जेव्हा गरजेचं असेल तेव्हा तुम्ही या कार्डचा वापर करू शकता. विशेष म्हणजे या कार्डबरोबरच आपल्याला 24 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो.
- कॉम्बो कार्ड- सरकारी बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियानं काही दिवसांपूर्वीच 2 इन 1 रुपे डेबिट आणि क्रेडिटची सुविधा देणारं कॉम्बो कार्ड ग्राहकांच्या सेवेत आणलं आहे. बँकेनं 100व्या स्थापना दिवसानिमित्त खास कार्ड लाँच केलं आहे. त्यामुळे युनियन बँकेच्या ग्राहकांना डेबिट आणि क्रेडिट असं वेगवेगळं कार्ड ठेवण्याची आवश्यकता नाही.
- कॉम्बो कार्डची खासियत- रुपे प्लेटिनम डेबिट कार्ड आणि रुपे सेलेक्ट क्रेडिट कार्ड ही दोन्ही कार्डे वापरण्यासाठी दोन वेगवेगळे पिन जनरेट करावे लागणार आहेत. कार्ड स्वाइप केल्यानंतर आपल्याला डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पर्याय निवडल्यानंतर पिनच्या माध्यमातून तुम्हाला डेबिट-क्रेडिट कार्डाचा वापर करता येणार आहे.
- पैसे काढण्याची मर्यादा- डेबिट कार्डातून तुम्ही दरदिवशी 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. तर क्रेडिट कार्डाच्या मर्यादानुसार तुम्ही पैसे काढण्याची मर्यादा असते.
- अपघात विमा- कॉम्बो कार्डमध्ये तुम्हाला 24 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो आहे.