Join us

सरकारने PPF खात्याचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा होईल मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 3:19 PM

PPF Account New Rule : 12 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यानंतर एकाच व्यक्तीने उघडलेली दोन किंवा अधिक पीपीएफ खाती विलीन करता येणार नाहीत, असे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

नवी दिल्ली : तुम्हीही पीपीएफ खात्यात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारकडून एक नियम आला असून, त्याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर होणार आहे.

12 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यानंतर एकाच व्यक्तीने उघडलेली दोन किंवा अधिक पीपीएफ खाती विलीन करता येणार नाहीत, असे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. वित्त मंत्रालयाने या संदर्भात ऑफिस मेमोरेंडम (OM) देखील जारी केले आहे.

ऑफिस मेमोरेंडममध्ये असे म्हटले आहे की, पीपीएफ खाती चालवणाऱ्या संस्थांनी 12 डिसेंबर किंवा त्यानंतर उघडलेल्या पीपीएफ खात्यांच्या विलीनीकरणासाठी विनंती पाठवू नये. यामागे पीपीएफच्या 2019 च्या नियमांचा हवाला देण्यात आला आहे.

ऑफिस मेमोरेंडम जारी झाल्यानंतर, पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की 12 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यानंतर उघडलेल्या दोन किंवा अधिक पीएफ खात्यांपैकी फक्त एकच खाते सक्रिय राहील. बाकीची खाती बंद केली जातील. बंद केलेल्या कोणत्याही खात्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

उदाहरणार्थ, जर तुम्ही जानेवारी 2014 मध्ये एक पीपीएफ खाते उघडले आणि दुसरे फेब्रुवारी 2020 मध्ये उघडले असेल तर या प्रकरणात तुमचे फेब्रुवारी 2020 चे पीपीएफ खाते बंद केले जाईल. या खात्यावर कोणतेही व्याज मिळणार नाही. तसेच, जर तुम्ही पहिले खाते जानेवारी 2014 मध्ये आणि दुसरे खाते फेब्रुवारी 2017 मध्ये उघडले, तर तुमच्या विनंतीनुसार हे दोन्ही विलीन केले जातील.

टॅग्स :बँकपैसा